Saturday, July 18, 2020

ईशावास्योपनिषद

ईशावास्योपनिषद  (भाग  दुसरा)

परमेश्वर सर्वत्र आहे


ईशावास्यमिदम् सर्वम् यत्किञ्च जगत्यां जगत् ।

तेन त्यक्तेन भुञ्जीथा  मा गृधः कस्य स्विद् धनम् ।। 

या श्लोकातील पहिली ओळ अतिशय महत्वाची आहे.

"ईशवास्यमिदम् सर्वम्" "यत्किञ्च जगत्यां जगत्"

म्हणजेच ईश्वराचा वास सर्वत्र आहे. जी सृष्टी निर्माण झाली आहे, तिच्यात तो भरून उरला आहे. त्याच्याविना एक कणही नाही. 

हे सर्व विश्व  ईश्वराचेच असल्यामुळे माझे काहीच नाही.  इतरांकडे असलेले सुद्धा माझे नाही.  हीच भावना सतत मनात असेल तर मनात कोणतेही ताणतणाव निर्माण होत नाहीत. जीवन आहे तसे स्वीकारले की जीवन जगण्याचा आनंद आपण पूर्णपणे घेऊ शकतो. यामुळे आपण  सुखी, समाधानी होतोच आणि इतरांना सुद्धा सुखी करतो.

"यत्किञ्च जगत्यां जगत्"

 हा देव सर्व चराचरात भरलेला आहे, तो कणाकणात, अणुरेणुत आहे.  या जगात किंचितही अशी जागा नाही, जी ईश्वराने व्यापलेली नाही.

'तेन त्यक्तेन भुञ्जीथाः

  'जो त्यागतो, जो सोडतो   तो भोगतो' असा या सूत्राचा अर्थ आहे. 

 वाक्य म्हणजे विरोधाभास आहे. तुझ्या वाट्याला जे आले आहे ते तुझे झाले असे समजू नकोस. तुझ्याकडे आहे ते अनासाये आलेले आहे. त्याचा विवेकाने उपभोग घे. याचाच अर्थ तुला आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा निर्लेपपणे उपभोग घे. जे दुसऱ्याकडे आहे त्याचा लोभ ठेऊ नकोस. तुला जे मिळाले ते तुझे झाले असे समजू नकोस. 

कोणत्याही गोष्टीवर ताबा सांगणे सोडून दिले की ती गोष्ट भोगण्यात मजा येते. माझे माझे म्हणतो तेव्हा त्या गोष्टींच्या किमतीचे गणित आपण मांडत बसतो, त्यामुळेच मोकळेपणाने त्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही.

तुमच्या वाट्याला आलेल्या सर्व गोष्टींचा भोग घ्या, तुमच्या साठीच आहेत त्या.   परंतु हे सर्व माझेच आहे,  असा भ्रम ठेऊ नका.  प्रकाशमान तेजोमय सूर्य माझ्यासाठीच आहे, हे शक्य आहे काय.

सारे तुमचेच आहे याचाच अर्थ असा असतो की, तुमचे काहीही नाही !

 त्यामुळे  "तेन त्यक्तेन भुञ्जीथाः" या श्लोकात जीवन कसे जगायचे या बद्दल सुद्धा अर्थबोध होतो.

या जगात आपण आहोत तो पर्यंत असे काम करा की जेंव्हा तुम्ही होता त्यापेक्षा आपण जाऊ तेव्हा जग जास्त चांगले झालेले असेल.

आपल्या सहवासात असलेली माणस थोडी जास्त हसायला.. बोलायला लागलेली असावीत. 

आपल्यामुळे त्यांना सुद्धा प्रकाशमान करता आले पाहिजे....  ज्ञानाच्या प्रकाशाने...

आपण कुठलेलंही चांगले काम करत असतो, त्या वेळी कामातला आनंद, यश वाटून घ्यायचे असते.

 प्रेम याचा अर्थच मुळी देण्याची चढाओढ हा आहे.

अशा प्रकारे प्रेम करणारी, देणारी माणसे असतात  ती सूर्य असतात.  आपल्या तेजाने इतरांना सुद्धा प्रकाशमान करतात.
म्हणूनच आपली कामे प्रसन्न मनाने पूर्ण करा, ती कुशलतेने करणे हाच कर्मयोग आहे.

 मा गृधः कस्य स्विद् धनम् 

 दुसऱ्याच्या धन संपत्तीवर कधीही नजर ठेऊ नकोस. हे जग ईश्वराचे आहे, या विश्वात तुला पाठविले आहे ते कर्तव्य करण्याकरिता. दुसऱ्याच्या ऐश्वर्याकडे लक्ष देणे. तसेच दुसऱ्याची वेळ वाया घालविणे चोरी आहे.

 एखाद्याला दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा भेटणे  अथवा तुमच्यामुळे सभेला दहा मिनिटे उशीर झाला असेल तर,  त्या सभेत उपस्थित असलेले सर्वजण गुणिले दहा मिनिटे, तेवढी मिनिटे उपस्थितच्या आयुष्यातील चोरली आहेत.
 दुसऱ्याचे श्रेय घेणे, मेहनत केल्याशिवाय यश अधिकार घेणे, ही सुद्धा चोरी आहे. 

 जेव्हा माझे माझे करणे, मागत राहणे सोडू त्या दिवशी मनाची शांती, गाढ सुखाची झोप,  आनंद हे सर्व आपल्याकडे धावत येईल. 

हा चराचरात भरून राहिलेला ईश, तुझा माझा आपल्या सर्वांचा स्वामी आहे. त्यानेच आपल्या सर्वांचे आयुष्य एकमेकांत गुंफलेले आहे.

हा श्लोक अहंकारमुक्तीचा आणि चिंतामुक्तीचा मार्ग दाखवितो.

 एक राजा रथामधून जात होता. त्याला एक माणूस डोक्यावर जड ओझे घेऊन जाताना दिसला. राजाला त्याची दया आली. त्याने त्या माणसाला रथात घेतले. तो माणूस  ओझे तसेच डोक्यावर घेऊन रथात बसला. 

राजाने ओझे खाली ठेवण्यास सांगितल्यावर तो म्हणाला 'महाराज, तुम्ही मला रथात घेतले हेच मोठे उपकार आहेत. आता या ओझ्याचे वजन मी रथावर का टाकू?"

"आपली अशीच अवस्था झालेली असते"

 परमेश्वराने आपले ओझे वाहण्याची जबाबदारी घेतली आहे. हे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तरी ते वाहणारा तोच परमेश्वर आहे. मग हे  चिंतांचे ओझे आपण आपल्या डोक्यावर का घ्यायचे ?



// श्री कृष्णार्पणमस्तु //

3 comments:

  1. अप्रतिम, सहज सोप्या भाषेत आपण समजावलं त्या बद्दल आभार

    ReplyDelete
  2. ज्ञान,अतिशय सहज समजाऊन दिले धन्यवाद
    प्रगल्भ विचारांच्या व्यक्तिच असे करु शकतात

    ReplyDelete