Sunday, July 12, 2020

विपश्यना (भाग एक)

विपश्यना 

विपश्यना म्हणजे स्वतःला विशेष रीतीने पाहणे. 

विपश्यना ध्यानाची सुरुवात  "आनापान" द्वारे होते. नाकपुड्यातून आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मन एकाग्र होते. त्या नंतर ह्या एकाग्र झालेल्या मनाला नाकपुड्याच्या खाली तसेच वरील ओठाच्या वर होणाऱ्या सवेदनांकडे लक्ष देण्याची कामगिरी दिली जाते. हा अभ्यास सतत तीन दिवस केल्यावर चौथ्या दिवशी विपश्यना दिली जाते. 

आनापानाची पुढील पायरी विपश्यना आहे. या मध्ये सूक्ष्म झालेले मन टाळूवर, ब्रम्हरंघ्रावर नेऊन तेथे होणाऱ्या संवेदना मनचक्षुने पहायच्या असतात. त्यानंतर मन संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवावर नेऊन तेथील संवेदना समता भावाने, स्थितप्रज्ञतेने पहायच्या.  सुखद किंवा दुःखद संवेदनावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही.  याद्वारे शरीरात आणि मनात चाललेल्या घडामोडींची अनुभूती होते. ही झाली विपश्यना साधनेची व्यवहार्य बाजू.

विपश्यना एक विद्या आहे, जीच्या नियमित साधनेमूळे आपण शांतीचे निरामय जीवन जगू शकतो. 

अडीच हजार वर्षांपूर्वी "सिद्धार्थ गौतम" याने या विद्येचे पुनरुज्जीवन केले आणि विपश्यना साधना करून वयाच्या 35 व्या वर्षी निर्वाण (अरहत) अवस्था प्राप्त केली. जन्म मरणाच्या भवचक्रातून तो मुक्त झाला, सम्यक संबुद्ध झाला. ही विद्या त्याने पुढील 45 वर्ष सर्व मानव समाजाला वाटली. या कालावधीत हजारोनी निर्वाण अवस्था प्राप्त केली, तर करोडो गृहस्थाश्रमी आणि भिक्षुक, आसक्तीमुक्त आणि क्रोधमुक्त अवस्था प्राप्त करून सुखशांतीचे जीवन जगू लागले.  ह्या विद्येचा प्रसार प्रचार कंबोडिया थायलंड  लाओस श्रीलंका ब्रम्हदेश या पूर्वेकडील देशात सुद्धा झाला. 

त्या पुढील 500 वर्षानंतर ही विद्या भारतातून लुप्त झाली. ब्रह्मदेशात हीच विद्या गुरुशिष्य परंपरेने तिच्या मूळ आणि शुद्ध रुपात टिकून राहिली. ही विद्या भारतात 1969 साली पुन्हा श्री सत्यनारायण गोयंका यांनी आणली आणि आता तिचा प्रचार प्रसार भारतात आणि भारताबाहेर सुद्धा होत आहे.

विपश्यनेचे पाहिले निवासी केंद्र इगतपुरी येथे 1976 साली बांधले गेले. आता भारतात आणि जगभरात मिळून एकूण 185 विपश्यना केंद्र आहेत. लाखो व्यक्तींनी विपश्यनेचा अभ्यास, साधना करून आपले जीवन सुख शांतीमय केले आहे.


आपल्या जीवनात येणाऱ्या जवळपास 99 टक्के व्याधी, आजार;  मनोविकारामुळे (सायको सोमॅटीक आजार) निर्माण होतात. डायबिटीज, रक्तदाब, मायग्रेन, हृदयविकार, अर्धांगवायू, ब्रेन हामरेज इत्यादी सर्व आजार मानसिक ताणतणावामुळे निर्माण होतात. जीवनात ताणतणाव निर्माण होण्याचे मुख्य कारण आसक्ती आणि क्रोध हे आहे. विपश्यना साधनेद्वारे आसक्ती आणि क्रोध या पासून मुक्तता मिळविता येते आणि जीवनात सुख, शांती, समाधान याची प्राप्ती होते. 

स्त्री असो किंवा पुरुष, धनवान असो की गरीब, हिंदू असो की मुस्लीम किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही प्रांताचा असो की कोणत्याही देशाचा असो; प्रत्येकाला सुख, समाधान आणि शांती हवी असते. हे सार्वजनिन त्रिकालाबाधित सत्य आहे.

प्रत्येकाला रात्रीची निवांत झोप हवी असते. पण असे घडते का? याचे मूळ कारण आहे, मानसिक अशांतता आणि ताणतणाव; तसेच आसक्ती आणि क्रोध.   विपश्यना, जीवनात निर्माण होणाऱ्या दुःखातून बाहेर पडण्याची कला शिकवते. त्यामुळे आपण तर सुखी होतोच असेच  आपले कुटुंब, समाज, देश आणि सारे विश्व सुखी होते.

 विपश्यना जीवन जगण्याची कला तर शिकवतेच तसेच मरणाला सुद्धा कसे सामोरे जावे ही मरण मरण्याची कला सुद्धा शिकविते.

विपश्यना " बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हाच संदेश सर्व विश्वाला देते. निसर्ग नियमांचे पालन आपल्या जीवनात कसे करायचे याचे प्रशिक्षण देते. धर्माचे पालन करणे म्हणजेच निसर्गाचे नियम आपल्या जीवनात उतरविणे. या निसर्ग नियमाच्या विपरीत वागला की ताणतणावाचे दुःख होते तर अनुरूप वागण्यामुळे शांतीचे, समाधानाचे सुख मिळते.

मंगल हो !

सतीश विष्णू जाधव

4 comments:

  1. निसर्गाचे नियम आपल्या जीवनात उतरविणे. या निसर्ग नियमाच्या विपरीत वागला की ताणतणावाचे दुःख होते तर अनुरूप वागण्यामुळे शांतीचे, समाधानाचे सुख मिळते.
    सर
    मला या वाक्या बद्दल आणखी स्पष्टीकरण वाचावयास मिळाले तर खूप बरी होईल

    खुप चांगली अभ्यासक माहिती आहे

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच हरेश !!!

      या वर लवकरच विवेचन करतो...

      स्वतंत्र ब्लॉग लिहितो...

      धन्यवाद !!!

      Delete
  2. विजय कांबळे.July 13, 2020 at 9:49 AM

    सर आपण लिहिले आहे की 99% रोग हे मानसिक रित्या निर्माण होतात. सध्या चालू असलेल्या करोना बाबत आपले काय मत आहे.

    ReplyDelete
  3. विजय भाऊ, धन्यवाद !!!

    अतिशय मार्मिक प्रश्न आहे तुमचा...

    करोना ही महामारी आहे हे आपण जाणताच...

    आणि ह्या महामारी पासून वाचण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हे अतिशय महत्वाचे आहे. परंतु या महामारीच्या अनुषंगाने आलेल्या लॉक डाऊनमुळे मानसिक नैराश्य, ताणतणाव यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

    ह्या आपत्कालीन परिस्थितीनुन बाहेर पडण्यासाठी आणि मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी विपश्यना आवश्यक आहे.

    करोना हा रोग जरी मानसिक नैराश्यातून निर्माण झाला नसला तरी , त्याच्या प्रादुर्भावामुळे मानसिक नैराश्यात प्रचंड प्रमाणात वाढ मात्र झाली आहे.

    ReplyDelete