Thursday, July 23, 2020

पवई सायकल राईड

*पवई सायकल राईड*

सकाळी सहा वाजता सायकलवर टांग मारली आणि निघाली स्वारी निसर्गाकडे. सकाळी बायकोने विचारले, 'कुठे आजची राईड'  म्हणालो, 'माहीत नाही'.

खरं तर आज निसर्गात राईड करायची एव्हढेच ठरविले होते. कुठे जायचे तर मन नेईल तिकडे, हा एकच विचार. 

सेनापती बापट मार्गावरून दादरकडे निघलो आणि पाऊस सुरू झाला. दादर स्टेशन जवळचा केशवसुत पूल ओलांडला. समोर भाज्यांच्या टेम्पो आणि ट्रकची तुडुंब गर्दी होती. अजूनही प्लाझा भाजी मार्केट सुरू न झाल्यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या गाड्या रस्त्यावरच भाजीपाल्याची विक्री करत होते. 
पावसाच्या सरीसारखा भाजीपाला ओसंडून वाहत होता. त्यातून वाट काढत माहीम गाठले. माहीमच्या खाडी जवळ पावसाने वाऱ्यासह फेर धरला होता. 

 पाडगावकरांची कविता मनात फेर धरू लागली.

कुरवाळित येतिल मजला  श्रावणांतल्या जलधारा  /
सळसळून भिजलीं पानें  मज करतिल सजल इषारा //

पावसात भिजण्याची मजा काही औरच असते. सकाळच्या मंद प्रकाशात रस्त्यावरच्या पाण्यावर समोरून येणाऱ्या गाडीचे लाईट परावर्तित होतात, तेव्हा पाण्याखालून आणखी एक गाडी चालल्याचा भास होतो.

बांद्राचा पूल ओलांडून पश्चिम द्रुतगती महामार्गावर आलो. येथे रहदारी खूपच वाढली होती. आता पावसासह वाऱ्याचा वेग वाढला होता, त्यामुळे सायकलचा वेग कमी झाला. हायवे रस्त्याच्या डाव्या बाजूने पाण्याचे पाट वाहत होते.  त्यातून सायकल चालविताना पाणी बाजूला उडत होते, परंतु मडगार्ड लावल्यामुळे रस्त्यावरचे पाणी तोंडावर येत नव्हते. बाजूने जोरात जाणाऱ्या गाड्या रस्त्यावरच्या पाण्याचा तिरकस मारा अंगावर करीत होत्या. 

आता नखशिखांत भिजलो होतो. पावसाच्या धारा शरीरावरुन खाली ओघळत होत्या. जसेकी पाण्यात स्पीडबोट चालवतोय. जोगेश्वरीला हायड्रेशन ब्रेक घेतला. विक्रोळी लिंक रोडला सायकल वळवली आणि चढाचा रस्ता सुरू झाला. या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याचा मध्यभाग पत्रे मारून बंद केला आहे.  त्यामुळे चिंचोळ्या रस्त्यावरून सावधपणे सायकल चालवीत होतो. थोड्या वेळातच एका ब्रिजवर आलो.  समोरच पवई तलाव परिसर दिसू लागला. 


आता पाऊस थांबला होता. दोन फोटो काढून पवईच्या मुख्य व्हिव पॉईंटवर आलो. व्हिव पॉईंटचा हिरवागार परिसर तसेच पवई जलाशयाचे शांत पाणी आणि पलीकडे डोंगरमाथा हा निसर्गाचा नयनरम्य नजारा पाहिल्यावर मन मोहरून गेले.

सायकल रेलिंगला लावली. त्या पॉईंट वर मी एकटाच होतो. बसायची पायरी सुद्धा ओलसर होती. सुकामेव्याचा डबा काढला आणि बदाम काजूचा एक एक दाणा खात तो विहंगम निसर्ग मनात साठवू लागलो.


आकाशात विहारणारे काळे सावळे मेघ, तलावा जवळील टेकड्यांचे पाण्यावरील प्रतिबिंब, ते धारण केलेला तलाव ,त्याभोवतीची हिरवी हिरवळ,त्यानंतर दिमाखात उभी सायकल आणि तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा आनंदी भटक्या !!!   हे रेखाचित्र मनात तयार झाले. 

तेथे काढलेले फोटो गृपवर शेअर केले आणि पंधरा मिनिटांनी विक्रोळी हायवेकडे निघालो. येथून विक्रोळीकडे उताराचा रस्ता आहे. त्यामुळे सायकल भन्नाट वेगाने पळू लागली. पूर्व द्रुतगती हायवेला आलो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला निसर्गरम्य हिरवाई दिसू लागली. पश्चिम महामार्गावर दोन्ही बाजूला सिमेंटच जंगल दिसत तर पूर्व महामार्गावर एका बाजूला हिरवाईने नटलेले कांदळवन तर दुसऱ्या बाजूला गच्च हिरवीगार वनराई दिसते. 

येथून मार्गक्रमण करताना कवयित्री शांताबाई शेळकेंची कविता गुणगुणू लागलो.

पावसाच्या धारा, येती झरझरा 
झांकळलें नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्यालें ओहळ, जाती खळखळ 
जागोजागीं खाचांमध्यें तुडुंबलें जळ 

ढगांवर वीज, झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज 

झोंबे अंगा वारे, काया थरथरे 
घरट्यांत घुसूनिया बसलीं पांखरें

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी 
पानोपानीं खुलतसें रंगदार छवी

थांबला पाऊस, उजळे आकाश 
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश 

किरण कोंवळे, भूमीवरी आले 
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुलें

पावसात न्हाली, धरणी हांसली,
देवाजीच्या करणीने, मनी संतोषली !

या कवितेच्या स्वरांचा पाऊस अंगावर घेत निवांत घरी पोहोचलो


सतीश विष्णू जाधव

10 comments:

  1. सतिष!जिवन जगण्याची तुझी अदाकारी आहे बेहिसाब! निसर्गाचा मागोवा घेऊन वर्ततोस लाजबाब!

    ReplyDelete
  2. मनातले चलत विचार ज्या ताकदीने आपल्या माय मराठी भाषेत तुम्ही तुमच्या प्रवासवर्णनामध्ये सहज मांडणी करतात फार सुंदर वर्णन आहे.
    - स्वप्निल नागरे

    ReplyDelete
  3. नमस्कार गुरुजी,

    'आनंदी भटक्या'ची भतकंती आवडली.

    जीवनामध्ये माणसाला अगदी छोट्या छोट्या गोष्टिंमध्ये सुद्धा आनंद शोधता यायला हवा.
    आणि ही कला ज्याच्याकडे आहे त्याच्या जीवनात आनंदाला काय तोटा !!!!

    त्यामुळे आनंदी कसं राहायचं हे खरोखर तुमच्याकडून शिकावं !!!!

    जसे की बालकवींना सगळीकडेच आनंद दिसतो:

    आनंदी-आनंद गडे!
    इकडे, तिकडे, चोहिंकडे.
    वरती-खाली मोद भरे;
    वायूसंगे मोद फिरे,
    नभांत भरला,
    दिशांत फिरला,
    जगांत उरला,
    मोद विहरतो चोहिंकडे;
    आनंदी-आनंद गडे!

    सूर्यकिरण सोनेरी हे,
    कौमुदि ही हंसते आहे;
    खुलली संध्या प्रेमानें,
    आनंदे गाते गाणें;
    मेघ रंगले,
    चित्त दंगले,
    गान स्फुरले,
    इकडे, तिकडे, चोहिंकडे;
    आनंदी-आनंद गडे!

    वाहति निर्झर मंदगति,
    डोलति लतिका वृक्षतती;
    पक्षि मनोहर कूजित रे,
    कोणाला गातात बरें?
    कमल विकसलें,
    भ्रमर गुंगले,
    डोलत वदले-
    इकडे, तिकडे, चोहिंकडे;
    आनंदी-आनंद गडे!

    स्वार्थाच्या बाजारांत,
    किती पामरें रडतात;
    त्यांना मोद कसा मिळतो?
    सोडुनि स्वार्था तो जातो;
    द्वेष संपला,
    मत्सर गेला,
    आतां उरला;
    इकडे, तिकडे, चोहिंकडे;
    आनंदी-आनंद गडे!
    ................ बालकवी.


    तसं पाहिलं तर किती छोटीशी गोष्ट आहे,

    "सकाळी सहा वाजता घरून निघून सायकलने पश्चिम द्रुतगती महामार्गाने पवई तलावाला गेलो आणि पूर्व द्रुतगती महामार्गाने परत घरी पोहोचलो."

    परंतू हेचं तुम्ही किती छान प्रकारे लिहून वाचणाराला सुद्धा आनंद मिळवून दिला आहे.

    'सरस्वती माता' तुमच्या लिखाण रुपाने मुक्तपणे विहार करताना दिसते आहे.

    पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी आणि शांताबाई शेळकेंची कविता खूपच आवडली.

    फोटोंची मांडणी नेहमी प्रमाणे छान.

    मी तुमच्या संपूर्ण सायकल सफरीचा भरपूर आनंद मिळविला.

    असेच लिहिते रहा आणि आम्हा वाचकांसाठी आनंदाची उधळण करत रहा.

    धन्यवाद !!!!

    .... लक्ष्मण गणपत नवले

    ReplyDelete
    Replies
    1. लक्ष्मण भाऊ ...

      तुमची समीक्षा एकदम भावली...

      बालकवींचे आनंदी गीत खूप काही देऊन जाते.

      ती कविता म्हणजे आनंदाचा अविरत आणि अथांग सागर आहे....

      तुम्ही अतिशय सुंदर लिहिता याची प्रचिती आली

      खूप खूप धन्यवाद!!!

      Delete
  4. मामा तुमचे लिखाण अतिशय सुरेख आहे. मस्त आवडले. सुंदर छायाचित्रे.

    ReplyDelete