Monday, July 13, 2020

विपश्यना (भाग तीन)

१३.०७.२०२० 

धर्म, निसर्गाचे नियम आणि विपश्यना.



विपश्यना, म्हणजे जे जसे आहे, तसे त्याला पाहणे.

 विपश्यना ही भारतातील अतिप्राचीन ध्यानपद्धतींपैकी एक आहे. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी तिचे पुनरुज्जीवन केले.

या विद्येद्वारे  जीवन जगण्याची कला शिकता येते. 

 या ध्यानपद्धतीचे प्रमुख लक्ष्य  मानसिक अशुद्धता पूर्णपणे काढून टाकणे आणि मुक्तीचा सर्वोच्च आनंद मिळवणे हे आहे. 

विपश्यना ही आत्म-निरीक्षणाद्वारे स्व-परिवर्तन करण्याचा एक मार्ग आहे. याद्वारे मन आणि शरीरामध्ये असलेल्या खोल आंतरिक संबंधावर लक्ष केंद्रित करता येते.

शरीरामध्ये चेतना निर्माण करणाऱ्या भौतिक, शारीरिक संवेदनांवर शिस्तीने लक्ष देऊन विपश्यना अनुभविली जाऊ शकते. स्थितप्रज्ञ राहून स्वनिरीक्षणद्वारे करायचा हा  मनाचा प्रवास आहे. याद्वारे मानसिक अशुद्धता नाहीशी होते व मन प्रेम आणि करुणायुक्त स्थितीमध्ये परिवर्तित होते.

आपले विचार, भावना, निर्णय आणि संवेदना ह्या निसर्ग नियमानुसार चालतात हे स्पष्ट होऊ लागते. प्रत्यक्ष अनुभवाने आपल्याला समजते की, विकार कसे उत्पन्न होतात, बंधने/गाठी कशा बांधल्या  जातात आणि त्यापासून कशी मुक्तता मिळू शकते. जागृतता, भ्रांतीमुक्तता, स्व-नियंत्रण आणि शांतता हे जीवनाचे गुणधर्म बनून जातात.

ही संपूर्ण प्रक्रिया वस्तुत: मनाचा व्यायाम आहे. शरीराच्या व्यायामातून जसे आपण शरीराला सुदृढ ठेवतो, तसेच सुदृढ मन विकसित करण्यासाठी विपश्यनेचा उपयोग होतो.

विपश्यना साधनेचा अभ्यास करताना निसर्गाचे नियम काय आहेत याची जाणीव होते. यालाच धर्म म्हटले आहे. (स्वभावधर्म किंवा गुणधर्म).

मानवास होणारे सुख किंवा दुःख याची निर्मिती आणि त्याचे निराकरण याचा मार्ग विपश्यना साधनेद्वारे अवगत होतो.

 सृष्टीतील प्रत्येक गोष्ट  नित्य परिवर्तनशील आहे, अनित्य आहे. तर  जी नैसर्गिक तत्वे आहेत त्यावर या जगाचे रहाटगाडगे चालल आहे. 

निसर्गातील दृष्य ,अदृश्य सर्व गोष्टी ह्या नैसर्गिक तत्वाने बांधील आहेत आणि मनुष्यप्राणी सुद्धा या नैसर्गिक तत्त्वांचा भाग  असल्यामुळे ही तत्वे  समजून घेऊन जर आपण  आपले आयुष्य जगलो तर आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. 

 विपश्यनेचा अभ्यास करताना  "धर्म"  बाबत एक महत्वाची गोष्ट लक्षात येते.

  धर्म म्हणजेच "निसर्गाचे नियम" (विधिका विधान) होय. ते त्रिकालाबाधित आहेत आणि चिरंतन सत्य आहे.

विपश्यनेचा दररोज सराव केल्यावर आपले मन विकार-रहित होते आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या प्रकृतीवर तसेच  कार्यक्षमतेवरही होतो.

हे निसर्गाचे नियम सर्वांना सारखेच लागू आहेत.  राजा आहे की रंक, गरीब अथवा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष, कोणत्याही संप्रदायाचा असो, भारतीय असो की परदेशी, काळा असो की गोरा, या सर्वांवर निसर्ग नियमांची सारखीच हुकूमत आहे.

मग काय आहेत निसर्गाचे नियम, काय आहे धर्म...

धर्म म्हणजे गुणधर्म, स्वभावधर्म...

आगीचा धर्म काय आहे ?....

जळणे आणि जाळणे....

या आगी पासून आपण अन्न शिजवू शकतो किंवा एखाद्याचे घर पण जाळू शकतो. 

आग तिचा धर्म सोडणार नाही.


झाडाचा धर्म काय आहे....

फुले देणे, फळे देणे, शीतलता देणे...

मग त्या झाडाखाली चोर येवो की साव येवो, डाकू येवो की सज्जन येवो; झाड  अव्याहतपणे सर्वांना फुले, फळे आणि शीतलता देण्याचे कार्य करीतच राहते.

झाड त्याचा धर्म सोडत नाही.

माणसाच्या जीवनात हेच निसर्गाचे नियम  कार्यरत आहेत...

क्रिया तशी प्रतिक्रिया....

पेराल तसे उगवेल...

जर आपण एखाद्याला प्रेमाने हसून नमस्कार केला तर त्याची प्रतिक्रिया सुद्धा तशीच असणार आहे, तो सुद्धा तुम्हाला प्रेमाने नमस्कार करील. एखाद्यावर आपण रागावलो तर, तो सुद्धा आपला राग करील. 

विपश्यनेद्वारे ह्या निसर्गाच्या त्रिकालाबाधित सत्याची आपल्याला अनुभूती होते. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे आपण स्थितप्रज्ञ दृष्टीने, साक्षीभावाने पाहू शकतो. 

आपण लिंबाचे बीज लावले तर त्याच्या झाडाला आंबे येतील काय?  बिलकुल नाही.

त्यामुळे कसले बीज पेरायचे हे आपण ठरवू शकतो.

"शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी"

हा तुकाराम गाथेतील श्लोक हाच निसर्ग नियम सांगतोय.

निसर्गाचे नियम कळले की ते जीवनात उतरविण्याचे काम विपश्यनेच्या अध्ययनाद्वारे करता येते. याच्या चिरंतन अभ्यासाने, अध्ययनाने स्वतःचे जीवन सुखमय, शांतीमय आणि निरामय करता येते.

त्यातून मिळणारा आनंद हा चिरंतन असतो.

 विपश्यना हे जीवनात सुख-शांती प्राप्त करण्यासाठी एक प्रभावशाली तंत्र आहे.


सतीश विष्णू जाधव

5 comments:

  1. धर्म, निसर्गाचे नियम आणि विपश्यना.या कशा एक आहेत अथवा कशा प्रकारे एकमेकांशी संबधित आहेत याचा उलगडा मला अनुभवास आला
    सहज व सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे
    साधु... साधु....साधु.....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भास्कर !!!
      विपश्यानेचे ज्ञान सर्वांना व्हावे हा प्रयत्न आहे.

      Delete
  2. काढता तंत्रज्ञान आणि प्रगत vidhnyaan या मुळे आपण कुठे ना कुठे तरी निसर्ग नियमाचे उल्लंघन करून आपली जीवन शैली जगत असतो आ त्या मुळे आपल्या शरीरावर आ जीवनावर नकळत विपरीत होणारे परिणाम याची जाण ठेवून चांगली नैसर्गिक जिवन शैली जगण्यासाठी आपला हा लेख खूप प्रेरणादायी आहे

    ReplyDelete