Thursday, July 16, 2020

ईशावास्योपनिषद

ईशावास्योपनिषद  (भाग पहिला)

वेद आणि उपनिषद् 


ईशावास्योपनिषद् हे प्रथम आणि श्रेष्ठ उपनिषद् मानले आहे. कर्म व ज्ञान यांचा  समन्वय हा या उपनिषदाचा मुख्य विषय आहे.

 हे उपनिषद कर्मयोग सांगते. 'ईशावास्य' म्हणजेच ईश्वरच सर्व काही आहे. ईश्वर सर्वत्र आहे.  म्हणूनही त्याला 'ईशावास्य उपनिषद' म्हणतात.

माणसाचे जाणतेपण म्हणजेच ऋग्वेद होय. त्यामुळेच ऋग्वेदाची निर्मिती अव्याहत आहे. जे जे पाहिले, ऐकले, त्याचे अनुभवसिद्ध ज्ञान ऋग्वेदातून होते.

 या ज्ञानाचा ठेवा जीवनात कसा उतरवावा आणि सगळीकडे कसा पसरवावा याचे ज्ञान देणारा यजुर्वेद होय.
 
 त्यानंतर मंत्र आणि विचार यांचे स्वरबद्ध, तालबद्ध रूप म्हणजे सामवेद होय.
 
 तसेच आपण अनेक प्रकारची कामे करतो, स्वयंपाक, नोकरी, बागकाम, साफसफाई, विणकाम इत्यादी... ही सर्व कामे कशी  चांगली करता येतील. त्याचे आवश्यक साधनसामुग्री, तंत्रविषयक माहितीचे भांडार म्हणजे अथर्ववेद आहे.
 
परंतु या चार वेदांनी वेद पूर्ण होत नाहीत.
वेदांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना, विचार, आशंका यांचा मेळ घालताना गुरू शिष्यांमध्ये झालेली चर्चा, संवाद म्हणजे उपनिषदे होय. त्यामुळेच उपनिषदांना वेदांत म्हणतात.

या उपनिषदाच्या प्रारंभी एक प्रार्थना येते.  हा शांतीमंत्र  सर्व उपनिषदांचे सार आहे.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥

ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

ते परब्रम्ह पूर्ण आहे; तसेच हे  इंद्रियगोचर विश्वही पूर्ण आहे. 

पूर्ण असलेल्या परब्रह्मातून पूर्ण असलेल्या विश्वाचा उदय झाला आहे. 

एका पूर्णातून दुसरे पूर्ण काढून घेतल्यानंतर पूर्णच शिल्लक राहाते.

पूर्णातून जे जन्मते ते पूर्णच असते....

जसे की साखर घालून केलेली बर्फी, सरबत, श्रीखंड साखरेचा गोडपणा घेऊनच तयार होते. 

सागराच्या एका थेंबात सुद्धा संपूर्ण सागराचे गुणधर्म सामावलेले असतात. 

पणती असो किंवा मडके त्यातून मातीपण वेगळे करता येत नाही.

तसेच पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच शिल्लक राहते...

गंगेतून लोटा भरून घेतला म्हणून गंगा लहान होत नाही.  रिकाम्या पेल्यात आकाश असते, पेला फुटला  की पेल्यात असलेले आकाश अनंतात, आकाशात मिसळून जाते. पेला फुटला म्हणून आकाश फुटत नाही.

तद्वत मनात फुलणारे प्रेम ही अशीच अमर्यादित भावना आहे. प्रेम कोणालाही कितीही दिले तरी अमर्यादितच राहते.  

एका दिव्याने दुसरा दिवा पेटविला तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश तेवढाच राहतो. 

अथवा आई मुलाला जन्म देते तरी ती आई पूर्ण आईच राहते.

ब्रह्म हे पूर्ण आहे आणि त्यातून निर्माण झालेले  हे विश्व ही पूर्ण आहे.

विश्व नष्ट झाले अथवा अशी अनेक विश्वे निर्माण झाली.  तरी ब्रह्माला काहीच फरक पडणार नाही असा या शांतीमंत्राचा अर्थ आहे. 

या ब्रम्हात अनेक विश्व आहेत, याचा शोध विज्ञानाने घेतला आहे.

वेद आणि उपनिषद् हे मानवी कल्याण आणि मानवी सुख याच्याशी निगडित आहेत.

// श्री कृष्णार्पणमस्तु //

6 comments:

  1. सतीशभाऊ हा अभ्यास कधी करतोस
    वाचताना चांगले वाटते परंतू पुढे मोठे शुन्य🌹🙏👌

    ReplyDelete
    Replies
    1. राजेश तुझ्या सारखे मित्रच माझे प्रेरणा स्रोत आहेत.
      या विश्वाची निर्मिती शून्यातूनच झाली आहे. म्हणूनच त्या शून्याचा शोध घ्यायचा प्रयत्न आहे

      Delete
  2. वेद अभ्यास खूप गहन आहे आणि तुम्ही सोप्या शब्दात मांडणी करून अतिशय छान काम करीत आहात.
    ।। शिवकृष्णार्पणमस्तु ।।

    ReplyDelete
  3. हा विषय हाताळून सोप्या भाषेत मांडणे, अतिशय उल्लेखनीय काम, आमच्यासारख्या तरुण पिढीला उपनिषेध समजून घेणे आजून सोपे जाईल. धन्यवाद

    ReplyDelete