Sunday, July 12, 2020

विपश्यना (भाग दोन)

कर्म सिद्धांत आणि विपश्यना
(संतोष कारखानीस यांच्या ब्लॉग वरून संकलित)


 भगवान गौतम बुद्धांनी या जीवनातील दु:खावर उपाय शोधताना अनेक प्रयोग केले. त्यातून तथागत भगवान बुध्दांना जे ज्ञान झाले त्यात कर्म सिद्धांताला  महत्व आहे. 

भगवान बुद्धांनी याला  'कर्म'  नाव न देता 'संस्कार' (पाली भाषेत 'संखर') असे नाव दिले.
 तथागतांनी  'भवचक्र' ('भव' म्हणजे 'असणे' 'भवचक्र' म्हणजे परत परत जन्म घेणे ) कसे चालते हे सांगताना या संस्कारांची किंवा कर्माची त्यामागे  काय भूमिका असते हे स्पष्ट केले आहे. 
 भगवान बुद्धांचा आग्रह प्रत्यक्ष अनुभूतीवर होता.
 ही अनुभूती मिळविण्यासाठी आणि त्याद्वारे दु:खातून आणि भवचक्रातून सुटका होण्यासाठी बुद्धांनी  विपश्यना (विपस्सना) ध्यानाचा मार्ग सांगितला आहे. विपश्यनेत प्रगती केल्यावर  संस्कार (कर्म) साठविण्याची प्रवृत्ती, तिचा जीवनावर होणारा  परिणाम याची स्पष्ट अनुभूती होते.

विपश्यना ह्या विद्येचे पुनरुज्जीवन भगवान गौतम बुद्धांनी केलं आणि ह्या विद्येच्या मार्गाने जाऊन निर्वाण अवस्था प्राप्त केली.

बुद्धांनी सांगितलेला सिद्धांत अगदी सरळ, सोपा आहे.

आपल्या पाच इंद्रियांना आणि मनाला बाह्य गोष्टीचा स्पर्श होतो. उदा, डोळ्याला काहीतरी दिसते, त्वचेला स्पर्श होतो, कानावर आवाज पडतो, जिभेवर चवीची जाणीव होते, नाकाला वास येतो, मनात विचार येतात. आपली  इंद्रिये ही केवळ ती संवेदना ग्रहण करण्याचे काम करतात.

ही संवेदना  मेंदूपर्यंत पोचल्यावर मेंदूचा एक हिस्सा जागृत होतो आणि त्या संवेदनेचे विश्लेषण करतो. आपल्या पूर्व-स्मृतीतून अशी संवेदना या पूर्वी कधी झाली होती काय हे आठवतो.


ही आठवण झाल्यावर मेंदूचा दुसरा हिस्सा काम करू लागतो आणि ही पूर्वी संवेदना सुखद होती का दु:खद याची चाचपणी करतो. 

यावेळी पूर्वीचे संस्कार (कर्मे) जागृत होतात आणि वेगाने मनाच्या पृष्ठभागावर येऊ लागतात. हे संस्कार सुखद असतील तर संपूर्ण शरीरावर सुखद तरंग अनुभवास येतात, दु:खद असेल तर दु:खद तरंग अनुभवास येतात. सुखद तरंग सुद्धा काही काळच टिकतात. तसेच सुखद तरंगांच्या इच्छेमुळे परत दु:खच वाट्याला येते.

हे संस्कार शरीरावर प्रकट झाल्यावर आपण अनवधानाने प्रतिक्रिया देतो. हे संस्कार आपल्या अंध प्रतिक्रियेमुळे वृद्धिंगत होतात, त्यांना बळ मिळते आणि ते परत अंतर्मनात खोलवर जातात. पुन्हा संधी मिळताच ते उफाळून वर येतात. परंतु प्रतिक्रिया न दिल्यास त्यांची उर्जा संपते (निर्जरा होते) आणि ते नष्ट होतात.

हे संस्कार देहाच्या (रूपस्कंद) पुढील क्षणाला सतत जन्म देतात आणि आपल्याला देहाचे सातत्यीकरण जाणवते.

माणसाच्या मृत्युच्या क्षणी यातील एखादा संस्कार (इच्छा) डोके वर काढते आणि हे संस्कारांचे (पूर्वसंचीत कर्मांचे ) गाठोडे नवीन  शरीराला (रूपस्कंद) जाऊन चिकटते आणि नवा जन्म मिळतो. यालाच भवचक्र म्हणतात.  हा मृत्युच्या क्षणी जागा झालेला संस्कार आपले पुढील आयुष्य ठरवितो.

विपश्यनेत ध्यानात खोलवर गेल्यावर हे पूर्वसंस्कार जागृत कसे होतात आणि आपण नकळत त्याला प्रतिक्रिया करून त्यांचे सामर्थ्य कसे वाढवितो हे स्पष्ट जाणवते. संस्कार जागृत झाल्यावर त्याला प्रतिक्रिया न करणे आपल्या हातात असते. त्यामुळे पूर्वसंस्कार (कर्मे) निर्जरा होऊन नष्ट होतात आणि मानसिक शांतता अनुभवास येते. 

हा वैयक्तिक अनुभव असल्याने त्याचे सामाजीकरण होऊ शकत नाही.

सुखद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पुण्यकर्म म्हणता येईल तर दु:खद संवेदना जागृत करणाऱ्या कर्मांना पापकर्म म्हणता येईल. पुण्यकर्म आणि पापकर्म हे एकमेकांना Cancel करीत नाहीत.

 पुण्यकर्म आणि पापकर्म यांना पांढऱ्या आणि काळ्या दगडांची उपमा देता येईल. माणूस या पुण्यकर्म आणि पापकर्म या दगडांनी भरलेली झोळी घेऊन फिरत असतो. काळ्या आणि पांढऱ्या दोन्ही प्रकारच्या दगडांना वजन असते आणि ते नेताना तो माणूस थकून जातो.

विपश्यना ध्यान हे संस्कारांना प्रतिक्रिया न देण्याची प्रक्रिया आहे. त्याचा कोठल्याही देवाशी, परमेश्वराशी संबंध नाही. 

 संस्कार जागृत होतात तेव्हा सावध राहून प्रतिक्रिया न दिल्यास अंतर्मनात दडलेले (अनुशय) संस्कार वेगाने बाह्यमनावर येतात आणि प्रतिक्रिया न दिल्याने त्यांची निर्जरा होते.

ज्यावेळी सर्व कर्मसंस्कार शून्य होतात तेव्हा माणूस कैवल्यावस्थेत / मुक्तावस्थेत / निर्वाण अवस्थेत पोहोचतो. 

तसेच कोठलेही काम करताना मनाच्या समतोल अवस्थेत असलो म्हणजेच,  चांगले/वाईट, हर्ष/दु:ख याच्या पलीकडे जाऊन मन समतोल असेल तर नवी कर्मे निर्माण होत नाहीत. 
विपश्यना ध्यानाच्या सहाय्याने अशा समतोल अवस्थेपर्यंत पोचता येते.
कर्माचा अर्थ बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अनुभवातून समजण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. 

विपश्यनेच्या नियमित साधनेद्वारे स्थितप्रज्ञ अवस्थेत पोहचून, आत्मिक समाधान, शांती प्राप्त करता येते.


सतीश विष्णू जाधव

5 comments:

  1. कर्म सिद्धांत आणि विपश्यना यांची उत्तम सांगड घातली आहे.
    सुंदर मांडणी केली आहे.
    आता तिसरा भागाची उत्कंठा लागली आहे.
    भास्कर शांताराम इसामे.

    ReplyDelete
  2. तुझ्यासारख्या स्थितप्रज्ञ माणसांसह हे शक्य आहे.सत्य ज्याला उमगले तो
    भवसागरात तरुन गेला

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!!!

      राजेश मित्रा!!!

      चला विपश्यना ध्यान करूया !!!

      Delete
  3. तुझ्यासारख्या स्थितप्रज्ञ माणसांसह हे शक्य आहे.सत्य ज्याला उमगले तो
    भवसागरात तरुन गेला

    ReplyDelete
  4. तुझ्यासारख्या स्थितप्रज्ञ माणसांसह हे शक्य आहे.सत्य ज्याला उमगले तो
    भवसागरात तरुन गेला

    ReplyDelete