Saturday, June 13, 2020

सेंच्युरी राईड १३, जून २०२०

सेंच्युरी राईड
१३, जून २०२०

सकाळी ४.५० ला घर सोडले. बिल्डिंगच्या बाहेर दूधवाला बसला होता. त्याच्या रेडिओवर " जिंदगी भर नही  भुलेंगे वो बरसात की रात" हे गाणे लागले होते.  रस्ते ओलसर होते पण पहाटे  पाऊस पडून गेला होता. परेलचा पूल उतरलो तर समोरच्या रस्त्यावर पिवळ्या फुलांचा सडा पडला होता. 

सायन पुलावर पोहोचलो, सकाळची रहदारी कमी होती. गम्मत म्हणजे माझ्या स्पीकरवर "सुखके सब साथी, दुख मे ना कोई" हे गाणे लागले होते. परंतु माझ्या राईडमध्ये तर सर्वांचीच साथ होती. मुख्य म्हणजे निसर्ग माझा जोडीदार होता.

साडेपाच वाजता घाटकोपर पार केले आणि कोकीळ स्वर कानावर पडले. हवेतील मंद गारवा हवाहवासा वाटत होता. गोदरेज गार्डन जवळ पोहोचलो. समोर दिसणाऱ्या झाडांनी धुक्याची चादर ओढली होती, उंच सुरुची झाडे हटयोगी साधू सारखी उभी राहून वाऱ्याच्या झोतावर डुलत डुलत मंत्रजाप करीत आहेत असा भास झाला. रस्त्यावरचे डेरेदार वृक्ष ध्यानस्थ बसलेल्या ऋषी सारखे दिसत होते.

सव्वा सहा वाजता तीन हात नाक्यावर पोहोचलो सकाळीच बाहेर पडताना गृपवर लाईव्ह लोकेशन टाकले होते. तसेच माझी राईड गायमुख पर्यंत आहे याची सुद्धा कल्पना दिली होती.  तीन हात नाक्यावर थांबल्यावर गृपवर मेसेज तपासले. कोणाचाही रिस्पॉन्स आला नव्हता. तेव्हढ्यात किशोरीचा मेसेज आला.  "सर, मी राईडला जॉईन होतेय".
पुढील कॅडबरी जंक्शनवर किशोरीची भेट झाली. घोडबंदर नाक्यावर वळसा मारून गायमुखकडे राईड सुरू झाली.
अर्ध्या तासातच गायमुख जवळ पोहोचलो. किशोरीला आणखी राईड करायची होती. फाउंटन हॉटेल पर्यंत जाऊया ह्या तिचा प्रस्तावाप्रमाणे चेना घाट चढणे सुरू झाले. ठाण्याच्या बाजूने या घाटाची चढाई जास्त आहे. 2-5 गियर लावून एका दमात घाट चढून गेलो. पुढील चेना क्रीक जवळ थांबलो. समोर नॅशनल पार्कचा रम्य परिसर दिसत होता.

 समोरील जुना ब्रिज त्याच्या खालून वाहणारे खाडीचे पाणी आणि त्याच्या पलीकडे गर्द वनराई मन मोहून टाकत होती. या खाडीत दोन महिला मासे पकडत होत्या. समोरील जुन्या पुलावर बऱ्याच सिनेमाचे शूटिंग झाले आहे, किशोरी म्हणाली.
या रस्त्याने बऱ्याच वेळा गेलो पण आज दिसणारी हिरवीगर्द वनराई अतिशय जिवंत वाटली. फोटोग्राफी करून दहा मिनिटातच फाउंटन हॉटेल जवळ पोहोचलो. 
सव्वा सात वाजले होते. अडीच तासात  51 किमी राईड झाली होती. दहा मिनिटांचा हायड्रेशन ब्रेक घेतला. 

आता परतीची सफर सुरू झाली. पुन्हा गायमुख गावाच्या हायवेला असलेल्या बगीच्या जवळ थांबलो. 
शांत असलेली ठाण्याची खाडी आणि तिच्या समोरच्या किनाऱ्याला  दिसणारा हिरवागार डोंगर तसेच त्या डोंगरामागे असलेले डोंगर ढगांच्या नीळाईत विरळ झाले होते. निसर्गाची एक खासियत आहे. प्रत्येक ठिकाणी तो वेगळा भासतो. तसेच निसर्गाच्या नवनवीन छटांची जाणीव होते. पण त्यासाठी निसर्गात एकरूप व्हावे लागते.

पुढे ओवळे गावाजवळ आलो. "कोरल" ची गावरान भाजी ( ही फक्त पावसात मिळते), तसेच चोखायचे  बिटकुळे आंबे, तोतापुरी कैऱ्या आणि अळूची भाजी खरेदी केली. सायकल सफरीसह घराची कामे सुद्धा सहज होऊन जातात. 

परतीची राईड सुद्धा अडीच तासात पूर्ण करायची होती. त्यामुळे घोडबंदर ठाणे हायवेवर लागणाऱ्या ब्रिजवरुन राईड केली. अर्ध्या तासात कॅडबरी जंक्शनला पोहोचलो. किशोरीची खूप दिवसांनी 40 किमीची मोठी राईड झाली होती.  तीला  सीऑफ केले. तसेच नियमित राईड करावी, हे पण सांगितले. 

ठाण्यातून आता जोमदारपणे मुंबईकडे राईड सुरू केली. मधे दोन ठिकाणी पाणी प्यायला थांबलो. हायड्रेशन ब्रेक पकडून साडेपाच तासात आजची 102 किमी राईड पूर्ण झाली होती. गेल्या तीन दिवसात माझ्या बऱ्याच मित्रांनी सेंच्युऱ्या मारल्या होत्या. त्यांचा आदर्श माझ्या पुढे होता. 
आजच्या राईडचे एक स्लोगन होते, 

*जे येतील त्यांच्या सह आणि नाही येणार त्यांच्या शिवाय सफरीचा आनंद घेणे*

सतीश जाधव

Wednesday, June 10, 2020

सह्या गोळा करण्याचा छंद दि.०९.०६.२०२०

सह्या गोळा करण्याचा छंद

शाळेत असताना सह्या गोळा करण्याचा छंद लागला.  चॉकलेटच्या रॅपरवर मोटारगाड्यांची चित्रे येत. ती चित्रे  चॉकलेट कंपनीने दिलेल्या वहीत योग्य नंबरवर चिकटवून सर्व वही पूर्ण भरून त्या कंपनीला पाठवायची. त्यामुळे कंपनी कडून मोठमोठ्या नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या सह्यांचा छोटासा गुलाबी रंगाचा अल्बम बक्षीस मिळाला होता. 

त्या अल्बम मध्ये प्रथमच महात्मा गांधीजींची सही होती. त्या नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर यांच्या सह्या  होत्या. पाब्लो पिकासो, विल्स्टन चर्चिल यांच्या सुद्धा सह्या होत्या.

याच अल्बम मध्ये प्राध्यापक शिवाजीराव भोसले, शिवशाहीर दादासाहेब पुरंदरे आणि ऐतिहासिक कथाकथनकार भारताचार्य प्राध्यापक सु ग शेवडे, पोलीस महानिरीक्षक अरविंद इनामदार, आध्यत्मिक गुरू पद्माकर वि वर्तक यांच्या  सह्या घेतल्या आहेत.

 माझ्या जीवन सफरीत ज्यांना ज्यांना मी गुरू मानले त्यांच्या सुद्धा सह्या ह्या अल्बममध्ये घेतल्या आहेत. 

हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री यांचे एक पुस्तक मिळायचे. त्या पुस्तकात हिरो हिरोईन यांचे पत्ते आणि जन्म तारीख असायची. आपल्याला आवडणाऱ्या हिरोला पोष्टकार्ड वर शुभेच्छा संदेश लिहून वाढदिवसाच्या अगोदर पाठवून द्यायचो. या अभिनेत्यांकडून त्यांचा पोस्टकार्ड साईज फोटो आणि त्याच्या वर त्यांच्या सहीचे कार्ड घरपोच पोष्टाने यायचे.

त्या काळचे प्रसिद्ध हिरो  दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, मनोज कुमार, राजेंद्र कुमार तसेच हिरॉईन नूतन, नर्गिस, माला सिन्हा, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेकांचे फोटो आणि सह्या गोळा केल्या होत्या.

हा सर्व सह्यांचा खजिना 26 जुलै 2005 च्या पावसात गहाळ झाला.

परंतू सह्या घेण्याची उर्मी शमली नव्हती.

मुंबई महापालिकेच्या ए विभाग कार्यालयातील जल विभागात कार्यरत असताना. दोन प्रसिद्ध व्यक्तींच्या सह्या मिळाल्या. एक प्रसिद्ध सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम आणि दुसरी अतिशय प्रसिद्ध व्यक्ती जिचा मी चाहता आहे,  तिच्या सहीची गोष्ट  सांगणार आहे.
 ०२ जानेवारी २००६ रोजी काळाघोडा येथील चेतना रेस्टॉरंट मध्ये माझ्या अधिकाऱ्यांसह दुपारी जेवायला गेलो होतो. हे रेस्टॉरंट ट्रॅडिशनल  शाकाहारी जेवणासाठी खूप प्रसिद्ध आहे. तेथे राजस्थानी फूड फेस्टिव्हल सुरू होते. आम्ही जेवायला बसलो, इतक्यात समोर लक्ष गेले, एका टेबलवर आशाताई भोसले काही परदेशी व्यक्तींसह  बसल्या होत्या. त्यांचे जेवण आटपून त्या निघायच्या तयारीत होत्या

आशताईंचा मी कॉलेज जीवनापासून फॅन आहे. क्षणाचा विलंब न लावता खिशातील छोट्या डायरीचे पान फाडले आणि आशाताईंच्या पुढ्यात उभा राहिलो.

"आशाताई मी तुमचा चाहता आहे, या नवीन वर्षात तुमची सही हवी आहे". 

 हसत हसत आशाताईंनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, 'काय रे नाव तुझं'  क्षणभर मी गांगरलो  आणि नाव सांगितले. आशाताई गोव्याच्या आहेत आणि गोव्यात एकेरी नावाने हाक मारणे हे प्रेमाचे, आपुलकीचे प्रतीक आहे याची जणीव झाली.

आशाताईंनी एक मेसेज लिहिला आणि सही करून कागद माझ्या हातात दिला. तो मेसेज वाचला आणि अपार आनंद झाला. खाली वाकून आशाताईंच्या पाया पडलो. त्या हॉटेल मधील सर्व व्यक्ती तसेच आशाताईंच्या समोर बसलेल्या परदेशी व्यक्ती आश्चर्याने माझ्याकडे पाहत होत्या. परंतु मी माझ्याच आनंदात मश्गुल होतो.

आशाताईंनी लिहिले होते, " हे नवीन वर्ष सुखाचे आहे, प्रिय सतीश"

आशाताई गायकीने खूप मोठ्या आहेत हे माहीत होते. पण मनाने सुद्धा अतिशय श्रीमंत आहेत आणि सकारात्मक दृष्टिकोन खच्चून भरला आहे याची जाणीव झाली. 

सर्व साधारणपणे "नवीन वर्ष सुखाचे जावो" अशा शुभेच्छा देतात, पण आशाताईंनी  "नवीन वर्ष सुखाचे आहे" अशा शुभेच्छा दिल्या होत्या.

नवीन वर्षातील पहिल्याच कार्यालयीन दिवशी आशाताईंचे प्रेमळ शब्द आणि त्यांच्या शुभेच्छासह मिळालेली सही मी आजही जपून ठेवली आहे.

माझ्या सह्यांचा छंदातील आशाताई भोसलेंची सही माझ्या मर्मबंधातली प्रचंड मोठी ठेव आहे. 

ही अनमोल सही आज तुम्हाला पेश करतोय.

सतीश जाधव

Monday, June 8, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Day Nine) 02.11.2019 Selam to Dindigal मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस नववा) सेलम ते दिंडीगल

 02.11.2019

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस नववा)  

सेलम ते दिंडीगल सायकल राईड

सकाळी साडेसहा वाजता सेलम जवळच्या 'अन्नामार हॉटेल' कडून राईड सुरू झाली. आज राईड सुरू करतानाच सुर्योदयाचे दर्शन झाले होते. 
सोपान, नामदेव आणि विकासने पंढरपूर सायकल वारीचे भगवे टीशर्ट घातले होते. विकासचा पाय दुखत होता. पण जिद्द कायम होती. दोन्ही पायाला नी-कॅप लावून आज सायकलिंग करत होता.
 दिंडीगल येथे आजचा मुक्काम होता.  सर्वजण एकत्र राईड करत होते. आज मी आणि लक्ष्मण लीड करत होतो. 
 
साडेसात वाजता सेलमच्या मुख्य चौकात पोहोचलो.  16 किमी राईड राईड झाली होती.

पुढच्या तासाभरात एकूण 30 किमी राईड झाली आणि नामक्कल गावात पोहोचलो. तेथील   टपरीवजा उडुपी हॉटेल मध्ये डोसा ऑर्डर केला. त्याच डोसा तव्यावर आम्लेट सुद्धा बनवले जात होते. शाकाहारी लक्ष्मणची गोची झाली, त्याने इडली ऑर्डर केली. मी डोसा आणि डबल आम्लेट ऑर्डर केले. इथली कॉफी मस्त होती. 

पुढे कन्याकुमारीच्या एका माईल स्टोन जवळ पंढरपूर वारकरी सोपान, नामदेव आणि विकासचे विठोबा स्टाईल फोटो काढले.
 नामदेवराव तर पुंडलिकाच्या आवेशात विठोबाला द्यायची वीट हातात असल्यासारखे, त्या माईल स्टोनवर एक हात वर करून उभे होते. तर दिपकचा त्या माईल स्टोनवर 'लाफिंग बाबा' आवेशात फोटो काढला. आज खऱ्या अर्थाने पळत सुटणारे सायकल स्वार निसर्गाचा, फोटोग्राफीचा आनंद घेत होते.

साडेअकराच्या  सुमारास नामक्कल टोल प्लाझाला पोहोचलो.  75 किमी राईड झाली होती. आज सुद्धा जेवणा ऐवजी इडली डोसा खात होतो.

ऊन चढले होते, दर अर्ध्या तासाने हायड्रेशन ब्रेक घ्यावा लागत होता. या हायवेवर धाबे तुरळक होते. एका हायड्रेशन ब्रेकमध्ये पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला बलुशाही आणि चिवडा खायला दिला.
 मुंबई कन्याकुमारी  सायकल राईड करत  "प्रदूषण मुक्त भारत"  हा संदेश सर्वाना देत असल्याबद्दल त्या पोलीस अधिकाऱ्याने आमचे कौतुक केले. त्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सुद्धा लक्ष्मण होते, हे विशेष.

पुढे गेलेल्या सोपान आणि कंपनीला आम्ही करूर शहराच्या अलीकडेच गाठले.
 आता भरगच्च नारळाच्या वाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरभरून लागत होत्या. या नारळांच्या झाडांखालची जमीन सुद्धा हिरवीगार दिसत होती. जणूकाही हिरवळीची दुलई अंथरली होती.

तीनच्या दरम्यान 120 किमी राईड झाली होती.  करूर शहर जवळ आले होते.  विकासच्या लक्षात आले, सोपनच्या सायकलचे मागचे चाक व्होबल करते आहे.    थांबून तपासताच समजले, चाकामधील एक तार तुटली आहे. कन्याकुमारी अजून 400 किमी होते, त्यामुळे सायकल दुरुस्त करण्यासाठी  लक्ष्मण, विकास, सोपान आणि मी करूर शहरात घुसलो.  दोन सायकलची दुकाने सापडली, पण नवीन तार सापडली नाही. सोपनने पुढे तशीच राईड करायचे ठरविले. 
 
या शहरातील "ताशी स्वीट बेकरी" मध्ये लक्ष्मण आणि मी मिठाईचा आस्वाद घेतला. विकास आणि सोपान पुढे गेले होते. 
तामिळनाडूचे  रस्ते एकदम मस्त होते. रस्त्यावर रहदारी कमी असल्यामुळे वायू प्रदूषण नव्हते.
उन्हाचा चटका जाणवत होता. मी आणि लक्ष्मण दमलो होतो. पुढे पाच किमी हायवेला आलो आणि जोरादार स्प्रिंट मारायला सुरुवात केली. रस्त्यात सर्वजण भेटले. आम्हाला पुढे जाऊन हॉटेल बुकिंगची कामगिरी मिळाली. दिंडीगलच्या भर चौकात "सुकन्या इन रेसिडन्सी"  हे छान पैकी हॉटेल मिळाले. रात्री आठ वाजता बाकीची मंडळी सायकलिंग करत हॉटेलवर पोहोचली. बेसमेंटमध्ये सायकल पार्किंगसाठी जागा होती.

170 किमी राईड उन्हामुळे खडतर झाली होती, परंतु कन्याकुमारी आता जवळ आल्यामुळे आम्हा सर्वांचा आत्मविश्वास बुलंद झाला होता.

सतीश विष्णू जाधव

Wednesday, June 3, 2020

निसर्ग वादळ आणि नाबाद 101 दि. 03.06.2020

निसर्ग वादळ आणि नाबाद 101

03.06.2020

चार दिवसांपूर्वी तरुण मित्र मंडळाच्या अंकीतचा मेसेज आला, तीन जूनला रक्तदान शिबीर भरविले आहे. सोशल डिस्टनसिंगमुळे रजिस्ट्रेशन करावे लागेल.  मला सकाळी 11 वाजताची वेळ मिळाली.

गेले दोन दिवस निसर्ग वादळाच्या बातम्यांचा सोशल नेटवर्कवर भडिमार होऊ लागला आणि आज रक्तदान करू शकू काय असा संभ्रम मला पडला.

आज,  3 जून, जागतिक सायकलिंग दिवस. परंतु आप्तस्वकीय, मित्रमंडळी यांच्याकडून सायकलिंगला बाहेर पडायचे नाही असा प्रेमाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता.

सकाळी सहा वाजता उठल्यावर खिडकीतून निसर्गाकडे पाहिले. आभाळ भरून आलेले, हलका हलका वारा वाहत होता. झाडांची सळसळ,  बारीक बारीक पावसाच्या थेंबांचा पत्र्यावर होणारा तडतड आवाज, पक्षांचा किलकीलाट, दुरून येणाऱ्या मालगाडीचा खडखडाट, रेल्वे क्वार्टस मधून ऐकू येणारी कोबड्याची बांग, समोर दिसणाऱ्या गगनचुंबी इमारती या सर्व वातावरणात मन तल्लीन झाले. आठ कधी वाजले कळलेच नाही.

नास्ता आटपल्यावर अंकितला फोन केला. त्याने रक्तदान शिबीर चालू झाल्याचे सांगितले. माझा फोन घरातली मंडळी ऐकत असल्यामुळे बाहेर पडायला वेगळी परवानगी मागण्याची आवश्यकता लागली नाही.

सकाळी पावणे अकरा वाजता सायकल बाहेर काढली. विंडचिटर, हेल्मेट, हॅन्डग्लोज, मास्क इत्यादी सर्व सेफ्टी गियरसह लोअर परळ वरून लालबागला सायकल सहल सुरू झाली. पंधरा मिनिटात पोहोचायचे असल्यामुळे लोअर परळ स्टेशन मार्गे जायचे ठरविले. मुख्य पूल पाडल्यामुळे स्टेशनच्या दादरावर सायकल उचलून घ्यावी लागली. 
स्टेशनच्या पूर्वेला जाऊन राईड सुरू झाली. वारे वाहत होते पण वादळी जोर नव्हता. त्यामुळे पंधरा मिनिटात लालबागच्या जैन मंदिरातील रक्तदान केंद्रात पोहोचलो. 

सोशल डिस्टनसिंगची अतिशय काटेकोर खबरदारी घेण्यात आली होती. रजिस्ट्रेशन केल्यामुळे माझा फॉर्म तयार होता. सर हरकिसनदास रुग्णालयाच्या रक्तपेढीचे सहकार्य होते.  
आज पहिल्यांदा हिमोग्लोबिन टेस्ट करण्याची मशीन पहिली. नॉर्मल हिमोग्लोबिन 12.5 ग्राम पर डेसीलिटर असते माझे 13.5 ग्राम पर डेसीलिटर होते. बिपी नॉर्मल होता. त्यांनी तात्काळ रक्तगट सुद्धा तपासला. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सर्व टेस्ट नॉर्मल आल्या.

हरकिसनदास रुग्णालयाचे टेक्निशियन महेश पेडणेकर आणि डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी  कोविड प्रोटेक्शन गाऊन घातले होते. त्यानंतर सुरू झाले माझे रक्तदान. तीन मिनिटे आणि एक सेकंदात 350 मिलीची बॅग भरली. माझी ही रक्तदानाची नाबाद 101 वी वेळ होती. 
हे महेशला समजल्यावर त्याला खूप आनंद झाला. डॉ कुलकर्णी यांनी हसत हसत  मला धन्यवाद दिले आणि रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र दिले.
आजच्या जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल वरून रक्तदानाला जाणे, ही माझ्यासाठी पर्वणी होती.

 रक्तदान आटपल्यावर लालबाग वरून के इ एम रुग्णालयातील फार्मसीकडे प्रस्थान केले. वाटेतील आय टी सी हॉटेल जवळील रस्त्यावर झाडांच्या पानांचा खच पडला होता. रिमझिम पाऊस सुरू होता. हवेचा जोर वाढला होता.
 
 तेथून दादर मंडईत गेलो. मंडईतील वर्दळ कमी झाली होती. भवानीशंकर मार्गावरील मोठमोठी झाडे वाऱ्याच्या तालावर डोलत होती. ब्राम्हण सेवा मंडळ हॉल समोरील झाडावरची पांढरी फुले फुटपाथ आणि रस्त्यावर विसावली होती. निसर्ग वादळाचे वेगळे रूप येथे पाहायला मिळाले.
रिमझिम पडणाऱ्या पावसाचा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा आस्वाद घेत, दुपारी दीड वाजता घरी पोहोचलो. आज 15 किमी राईड झाली होती.

जागतिक सायकल दिना निमित्ताने आज सायकल सफर तर झालीच, पण त्याच बरोबर रक्तदान (नाबाद 101) करण्याचा योग आला आणि निसर्ग वादळात निसर्ग विहार सुद्धा करता आला.

आज माझ्यासाठी ट्रिपल ट्रीट होती.

सतीश विष्णू जाधव

Tuesday, June 2, 2020

गुलमोहर राईड 02.06.2020

गुलमोहर राईड

02.06.2020


आझाद पंछी सायकल परिवाराच्या सदस्यांसाठी आजची राईड होती.  चिराग, प्रशांत, राजेश यांची भेट गेल्या तीन महिन्यात झाली नव्हती. सर्वांना भेटण्याची ईच्छा अनावर झाल्यामुळे आज सकाळीच मुंबईवरून विजयसह निघालो. 

वातावरण ढगाळ परंतु आल्हाददायक होते. स्पीकर वर  "ऐसा लगता है, तुम बनके बादल, मेरे बदनको भिगोके मुझे छेड रहे हो" हे गाणे लागले होते.

 पाऊस पडण्याचे चिन्ह होते. बऱ्यापैकी गारवा होता. सव्वा सहाला ठाण्याला पोहोचायचे असल्यामुळे वेगातच राईड सुरू झाली. कुर्ल्याला पावसाचा शिडकावा सुरू झाला. येथे दहा मिनिटे हायड्रेशन ब्रेक घेतला आणि पुढची सफर सुरू केली.

सकाळी सव्वा सहा वाजता चिराग तीन हात नाक्यावर पोहोचला होता. आम्हाला पाच मिनिटे उशिर झाला. मागोमाग अभिजितचे आगमन झाले.  जब मिलते है चार यार तो  फोटो बनता ही है.

प्रशांत काही अडचणीमुळे आला नाही. राजेशचा फोन आला, तो बाळकुंम नाक्यावर आम्हाला भेटणार होता.

तीन हात नाक्यावरून घोडबंदर हायवेवरील ओवळे गावापर्यंत जायचे ठरले. अभिजित आणि चिरागला वर्क फ्रॉम होम असल्यामुळे वेळेत घरी पोहोचणे आवश्यक होते. भरपूर पाणी पिऊन पुढची राईड सुरू केली. 

आता आमचा लीडर चिराग होता. अभिजितची भेट  कार्ला एकविरा राईडला  विजय आणि अभिजित बरोबर झाली होती. ठाणे नाशिक हायवे वरून घोडबंदरकडे वळसा घेऊन ओवळे गावाकडे प्रस्थान  केले. बऱ्यापैकी रहदारी होती रस्त्याला. चाळीस मिनिटात ओवळे गावाजवळ पोहोचलो. 

येथे  चोखायचे छोटे छोटे आंबे, तोतापुरी कैरी, चिकू घेऊन माळीण बाई बसली होती.
 

परवा इथेच जांभळे घेतली होती. माळीण बाईकडून आंबे आणि चिकू घेतले.  तिच्याच बाजूला बसलेल्या कोळीण ताईकडे पापलेट, कुपा, शिंगाडा आणि काटेरी मासे होते. एक मोठा कुपा मासा हातात धरून फोटो काढला.

येथून परतीची राईड सुरू झाली. वीस मिनिटात ब्रह्मांड हायवे परिसरातील बोगनवेलीजवळच राजेशची भेट झाली. खूप आनंद झाला  कारण राजेश बऱ्याच दिवसांनी भेटला होता. तेथे ड्रायफ्रूट खाण्यासाठी हायड्रेशन ब्रेक घेतला.


येथून बाळकुंम पाईप लाईनकडे सफर सुरू झाली. 

बाळकुंम जवळील कशेळी पाईप लाईन मधून सफर सुरू झाली. दोन भल्या मोठ्या पाईप लाईन मधून सायकलिंग करताना मन हरकून गेले.
 

दोन्ही बाजूला गुलमोहराची झाडे फुलली होती. गुलमोहराच्या फुलांचा सडा रस्त्यावर पसरला होता. स्वप्नात पाहिलेला फुलांचा मार्ग आज प्रत्यक्षात अवतीर्ण झाला होता.

 पोपट, बुलबुल, भारद्वाज, खंड्या पक्षांचा किलबिलाट मनात आनंदाचे झंकार निर्माण करत होते. निसर्गाचे हे अदभुत रूप पाहून मन मोहरून गेले. निसर्गाच्या या विविध रंगांच्या, संगीताच्या छटा अनुभवणे हा आजच्या सफरीचा क्लायमॅक्स होता.

पाच मिनिटात पाईप लाईनच्या शेवटाला पोहोचलो. पाईपवर बांधलेल्या मोठ्या चौथऱ्यावर चढलो. तेथून दिसणारा हिरवागार आणि गुलमोहरांनी बहरलेला परिसर म्हणजे निसर्गाचा परमावधी होता. 

त्या पाईप लाईन वरील अजस्र गेट व्हॉल्व जवळ फोटो काढले. निसर्ग दर्शन तर झकास झाले होते. 

हायवेला आल्यावर राजेशला टाटा केला. पुढे तीन हात नाक्यावर चिरागला बाय केले.  मुलुंड विक्रोळी हायवेला पाणी ब्रेक घेतला. येथे सुद्धा गुलमोहराच्या झाडाखालीच थांबलो. समोरील रस्त्याच्या मध्ये गुलाबी बोगनवेल फुलली होती. फुलांच्या धुंदीत घरी कधी पोहोचलो हे समजले ही नाही.

आजची गुलमोहर सफर फुलांनी बहरून गेली होती.

सतीश  विष्णू जाधव

Monday, June 1, 2020

पहिला पाऊस 01.06.2020

01.06.2020

पहिला पाऊस

सकाळी साडे पाच वाजता सायकल घेऊन बिल्डिंग खाली उतरलो. पाहतो तर काय... रिमझिम पाऊस सुरू... 

आज पावसात सायकलिंग करता येणार... मनात आनंदाचा पाऊस पडायला लागला. मोबाईल रॅप करून सॅक मध्ये टाकला.

रिमझिम पावसात राईड सुरू झाली. दादर फ्लाय ओव्हरच्या खाली पाणी तुंबले होते. पाण्यात सायकल चालविताना पुढच्या चाकाच्या दोन्ही बाजूने जोरदार तुषार तोंडावर उडत होते. ओलाचिंब झालो आणि आनंदात हरखून गेलो.

कुर्ल्याला आल्यावर अभिजीतला फोन केला. त्याचा फोन बंद होता. आता पाऊस थांबला होता, पण रस्ता ओला होता. त्यामुळे सायकल अतिशय सावधानतेने चालवत होतो.

सात वाजता मुलुंडला पोहोचलो. ढगाळ वातावरणामुळे सकाळचे  सूर्यदर्शन ढगांच्या आडूनच होत होते.
ओलसर रस्त्यामुळे गाड्यांचे लाईट परावर्तित होत होते. हायड्रेशन ब्रेक घेतला. 
टोल नाक्याजवळील मुलुंड फ्लाय ओव्हरला वळसा घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला.  मिठागरांजवळ  फ्लेमिंगो
  पक्ष्यांचे थवे विहार करत होते. माळे सारखे उडणाऱ्या फ्लेमिंगो मधील शेवटच्या पक्षाने पाण्यातील मासा पकडण्यासाठी डुबकी  मारली. त्या डुबकी बरोबर पाण्यावर उठलेले तरंग, मनात झंकार उठवून गेले.
या  पक्षांचे स्वच्छंदी जीवन पाहिले की वाटते; आपल्याला पंख असते तर गगनाला गवसणी घालणे किती सहज झाले असते.

पहिल्या पावसात एकट्याने राईड करण्यातले सुख काही वेगळेच असते.  मीच माझा राजा असतो आणि सेवक सुद्धा...

सतीश जाधव

Sunday, May 31, 2020

चेक पॉईंट सायकलिंग राईड 31.05.2020

 31.05.2020

चेक पॉईंट सायकल राईड

गेल्या तीन दिवसात फक्त मुंबईत सायकलिंग केली. त्यामुळे मुंबई बाहेर जाता येईल काय?,  तसेच अजून स्टॅमिना शाबूत आहे काय याची पडताळणी करण्यासाठी आजची राईड होती.

मुंबईवरून बोरिवली नॅशनल पार्क तेथून दहीसर टोल नाका पार करून घोडबंदर फाउंटन हॉटेल पर्यंत जाणे. त्यानंतर घोडबंदर मार्गे ठाण्याला जाऊन मुलुंड टोल नाका पार करून पुन्हा मुंबईला येणे हा आजचा रूट होता.

ठाण्यात राहणाऱ्या माझ्या समर्पयामि आणि आझाद पंछी सायकलिंग परिवारातील सदस्यांनी अजून मुंबईत सायकलिंग करण्याचे धाडस केले नव्हते. त्यांना आजच्या सायकलिंगमुळे मार्गदर्शन होणार होते.

विजय बरोबर मुंबई वरून सायकलिंग सुरू केली. गोरेगावला अतुल जॉईन झाला.

दोन्ही चेक नाक्यावर कोणतीही अडचण आली नाही. पाणी आणि नाश्त्याचा मुबलक साठा बरोबर होता.  परंतु आठ वाजल्या नंतर उन्हाच्या चटका जाणवू लागला. त्यामुळे आमच्या कडचे पाणी संपले. म्हणून बिस्लेरी पाणी विकत घ्यावे लागले.

सध्याच्या उष्ण वातावरणात भरपूर पाणी घेऊनच सायकलिंग करणे अत्यावश्यक आहे. विशेष म्हणजे घोडबंदर रस्त्यावरील ओव्हळा गावात टपोरी टपोरी जांभळं मिळाली. तेथेच विजयने छोटे छोटे चोखायचे आंबे सुद्धा घेतले.

पुढे ब्रह्मांड जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला तेव्हा नास्त्या बरोबर जांभळं खाणं, ही बाब लहानपणातील रानामेवा खाण्याच्या आठवणींना उजाळा देऊन गेली.

अतुल आणि विजयसह दोन महिन्याच्या लॉक डाउन नंतर केलेली 92 किमीची मोठी राईड सर्वार्थाने यशस्वी झाली होती.

मुंबईतून ठाण्यात सायकलींग करत जाणे किंवा येणे यात आता कोणतीच अडचण नाही. फक्त सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. 

माझ्या सर्व सायकालिस्ट मित्रांना विनंती आहे, बाहेर पडा निर्धास्तपणे सायकलिंगसाठी.

आजची राईड सर्व सायकालिस्ट मित्रांना समर्पित.

सतीश जाधव

Saturday, May 30, 2020

दोस्तांसाठी सायकल सहल 30.05.2020

दोस्तांसाठी सायकल सहल

30.05.2020

कालची पवई राईड झाल्यावर खूप दोस्तांचे फोन आले. सर्वांची इच्छा, पवई तलावाची पहाट पहायची आहे.  ठरली  पुन्हा एकदा पवई व्हीव पॉईंट सायकल राईड, दोस्तांच्या भेटींसाठी.

सकाळी सव्वा पाचला सोसायटीच्या खाली उतरताच रात्री पाऊस झाल्याचे लक्षात आले.  साडेपाच वाजता दादर फ्लाय ओव्हरवरुन काळ्या ढगांचे फोटो काढले.

निळ्या आकाशात तांबडं फुटलेलं. निवांत रस्त्यावर मोत्याच्या माळे सारखे चमकणारे स्ट्रीट लाईट आणि  ओलसर रस्त्यावरून परावर्तित होणारा पिवळसर प्रकाश, मनाची कवाडे उघडत होता. एक आगळंवेगळं निसर्गचित्र पाहायला मिळाले.

सहा वाजता अभिजित गुंजाळ, कुर्ला हायवेला भेटला. आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस, त्यामुळे त्याला लवकर घरी जायचे होते. तो घाबरत घाबरत सायकल घेऊन घराबाहेर पडला होता.

दादारपासून मागे लागलेले ढग अजूनही पाठ सोडत नव्हते.

ते सुद्धा सूर्याच्या आगमनाची वाट पहात होते.  सूर्योदयाची चाहूल लागताच, ढगांनी धूम ठोकली

विक्रोळी पवई जंक्शन जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला.

निखिल जोगेश्वरी वरून निघाला होता. तर गोरेगावला राहणारा शाळेतील मित्र विकास होशिंगला कुर्ला हायवे वरून मेसेज पाठवला अर्ध्या तासात पवई व्हिव पॉईंटला पोहोचतो म्हणून.

बरोब्बर पावणे सात वाजता पवई व्हिव पॉईंटला पोहोचलो. आजचा निसर्ग काहीतरी वेगळं सांगत होता.

दूरवर दिसणारे ढगांचे पुंजके, कापसाच्या शेतातील फुटलेल्या बोंडासारखे दिसत होते. आज अभिजित भलताच खुषीत होता. बायकोला स्पेशल ट्रीट द्यायचे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते.

इतक्यात निसर्गाच्या रंगमंचावर निखीलचा प्रवेश झाला. तब्बल अडीच महिन्यानंतर निखिल सायकल घेऊन बाहेर पडला होता. एकदम खुलला होता तो. काल रात्रीच सायकल अप टू डेट केली होती.  त्याच्या डोक्यावर उडणारे पक्षीच त्याच्या स्वातंत्र्याची साक्ष देत होते.

आज दोन सायकलिस्ट अभिजित आणि निखिल करोना भयातून मुक्त झाल्याचे मला जाणवले.

इतक्यात एक हसतमुख व्यक्तिमत्व आमच्या पुढे आले. आम्हा तिघांचा फोटो काढण्याची विनंती केली त्यांना.

 सकारात्मक हास्याने त्यांची ओळख पटली. हिरानंदानी मध्ये राहणारा "प्रशांत चव्हाण", आर्किटेक्ट आहे आणि VRS घेऊन आता स्वतःचा व्यवसाय करतोय. तसेच करोनाच्या भयातून मुक्त होऊन सकाळीच शरीर स्वास्थ्यासाठी निसर्गात विहार करतोयस. त्याला भेटून खूप आनंद झाला. काही व्यक्तीच्या भेटी खूप जवळीक साधतात. प्रशांत एव्हढा भावला की पहिल्या भेटीतच एकेरी नावाने हाक मारण्याची परवानगी त्याने दिलखुलासपणे दिली. पुन्हा त्याची भेट नक्कीच होईल.

शाळेतील मित्र विकास होशिंगला फोन केला पण काही घरगुती अडचणीमुळे तो बाहेर पडू शकला नाही.

निखिल आणि मी आणलेला खाऊ आम्ही मटकावला. परतीचा प्रवास सुरू झाला.

अहो आश्चर्यम् , सायन चुनभट्टी जंक्शनवर शाळकरी मित्र शरद शिंदे भेटला. माझ्या तोंडाला मास्क असल्यामुळे त्याने पटकन मला ओळखले नाही. शाळेतला मित्र भेटायचाच होता, विकास ऐवजी शरद भेटला.

आज सायकल सफारीचा मुख्य उद्देश माझ्या मित्रांना घराबाहेर काढणे हाच होता.

आजच्या लोकसत्ता वर्तमानपत्रात संपादक गिरीश कुबेर म्हणतात.. 

बागा.. उद्याने...समुद्रकिनारे ... खुले करा.

नागरिकांना घेऊ द्या मोकळ्या हवेत श्वास..

बघू द्या, त्यांना बदलत्या आकाशाचे रंग..

आणि ऐकू द्या त्यांना लाटांची गाज ....

घरात डांबणे हाच करोना प्रतिबंधाचा उपाय आहे  हे सिद्ध झालेले नाही.

संपूर्ण सहमत आहे या मताशी.

सतीश जाधव🙏

Friday, May 29, 2020

आझाद पंछी राईड 29.05.2020

29.05.2020

आझाद पंछी राईड

आजची सोलो राईड करोना भयगंडातून मुक्त होण्यासाठी आणि सर्वाना मुक्त करण्यासाठी होती.

वीस मार्च पासून तब्बल 70 दिवस आपण सर्व घरात आहोत. आता एक लक्षात आलंय, पुढील वर्षभर तरी आपल्याला करोनासह जगायचे आहे.

मग आता आपण कसली वाट पाहतोय. सोशल डिस्टनसिंग पाळून आणि सर्व आवश्यक खबरदारी घेऊन आता बाहेर पडावच लागेल.
म्हणूनच 26 आणि 28 मे ला सायकल राईड केल्या. यात एक लक्षात आले, हळूहळू मुंबई पूर्व पदावर येतेय. चेकपोष्टवर पोलीस सुद्धा आता अडवत नाहीत. सध्या फक्त जिल्हा बंदी आहे.

म्हणूनच आजची सोलो राईड लोअर परेल ते जोगेश्वरी, पुढे विक्रोळी लिंक रोड वरून पवई , तेथून विक्रोळी वरून पुन्हा लोअर परेल अशी होती मुंबईतल्या मुंबईत केलेली ही राईड अतिशय सुखरूप आणि आनंददायी ठरली. 
पवईच्या व्हिव पॉईंटवर थांबून निसर्ग भरभरून मनात साठवला. एकांतात 20-25 मिनिटे व्यतीत केली. स्वच्छंदी पक्षी आनंदात गगन विहार करताना पाहणे म्हणजे पर्वणी होती. सकाळच्या सूर्य किरणांनी सोनेरी झालेला पवई तलाव, काळे पांढरे ढग आणि त्यातून परावर्तित होणाऱ्या प्रकाश शलाका स्तिमित होऊन कितीतरी वेळ पाहत होतो.
मी पण पक्षी झालो होतो, स्वच्छंद, बेधुंद, बंधमुक्त, गगनात विहार करणारा *आझाद पंछी*

सतीश जाधव