Saturday, August 19, 2023

मुरबाड सायकल राईड आणि सायकल वाटप कार्यक्रम

मुरबाड सायकल राईड आणि सायकल वाटप कार्यक्रम
 
"आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन" तर्फे मुरबाड येथील काचकोने गावातील आदिवासी आश्रम शाळेतील  मुलींना सायकल आणि शालेपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमासाठी प्रज्ञा म्हात्रे ताईंचा फोन आला...अशा उपक्रमामध्ये उपस्थिती असणे हे माझे सौभाग्य होते... त्यात अंबरीशने पुढील कार्यक्रम आखला होता... माळशेज मार्गे शिर्डीला जाण्याचा... हा तर सुंदर योग होता...

 मुंबईहून पहाटे चार वाजता सायकलिंग सुरू झाली... नवनीत,  शिवम, सूरज यांची दादरला भेट झाली तर अंबरीश सचिनला घेऊन येत होता...

पहाटेच्या ब्रम्ह मुहूर्तावर सायकलिंग करणे म्हणजे निसर्गामध्ये एकरूप होणे असते... बरोबर साडेपाच वाजता माजिवडा फ्लॅगपोष्टला पोहोचलो... मागोमाग सचिन अंबरीश आले...

तुषार डोके आणि तुषार वासे आजच्या राईडचे गाईड होते.   जवळपास पंचवीस सायकलवीर या वारीत सामील होते... येथे सायकलिंग लिजंट  बारसे सर, कुलथे सर आणि भुसारा सर यांची भेट झाली...
 
हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते...सर्वांचा गृप फोटो काढला आणि कल्याण मार्गे सर्वांनी मुरबाडकडे प्रस्थान केले... कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याजवळ फाऊंडेशन तर्फे हायड्रेशन ब्रेक ठेवला होता... शहाड क्रॉस केले आणि सायकलीना वेग आला... तुषार सर्वांना व्यवस्थित मार्गदर्शन करत होता... 

पुढे कोलिम येथील पेट्रोल पंपाजवळ पाणी प्यायला सर्व थांबले... तेव्हा मुरबाडला राहणारा मित्र हरीश गगेला फोन केला... तो ऑफिसला गेला होता... परंतु हरीशने सर्व सायकल विरांसाठी मुरबाड बस स्टँड जवळ भाऊ हिम्मतला सांगून भजी आणि चहाची व्यवस्था केली...


काय योग आहे बघा... याच भागातील आदिवासी मुलींना सायकलचे वाटप करण्यासाठी आलेल्या माझ्या सायकल सहकाऱ्यांना अनपेक्षितरित्या नास्त्याचा पाहुणचार मिळाला... त्यात  पंढरपूर वारी सायकलने केल्यामुळे शाल श्रीफळ देऊन हिम्मतने माझा सत्कार केला... 

मुरबाड वरून सासणे काचकोने येथील आश्रम शाळा तेरा किमी अंतरावर आहे... हायवे सोडल्यामुळे गाड्यांची रहदारी कमी झाली होती... परंतु रस्ता रोलिंग टाईप चढ उताराचा होता... तसेच ऊन वाढल्यामुळे वेग कमी झाला... वाटेत बरेच सायकलिस्ट पाणी पिण्यासाठी थांबत होते... 

सर्व सायकलिस्ट आश्रम शाळेत पोहोचलो... शाळेच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून मुलांनी टाळ्या वाजवून आमचे स्वागत केले... 

सायकल आणि शिक्षण याची सांगड घालून आम्ही सायकल प्रेमीच्या फाऊडेशनच्या अध्यक्ष प्रज्ञा म्हात्रे ताईनी सायक्लोएज्यू कार्यक्रमांतर्गत पन्नास मुलींना नवीन सायकलचे वाटप तसेच  तीनशे दहा मुलांना दप्तर आणि शालेपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवला होता... 

हा अतिशय स्तुत्य उपक्रम होता...  आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशच्या सदस्यांनी  आणि विशेष करून संस्थापक प्रज्ञा म्हात्रे यांनी सतत दोन महिने अपार मेहनत घेतली होती...

गावापासून शाळेपर्यंत कोणतेही दळणवळणाचे साधन नसल्यामुळे मुलींना कित्येक किलोमीटर चालत यावे लागत होते... सायकल वाटपा मुळे वाचलेला वेळ त्या मुलींना अभ्यासात देता येणार आहे... सायकलिंगमुळे त्यांच्या  शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होऊन पर्यावरणाचे महत्व सुद्धा त्यांना कळणार आहे...

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आई कुठे काय करते फेम निरंजन कुलकर्णी तसेच राष्ट्रपती पदक विजेते वरीष्ठ पोलीस इन्स्पेक्टर श्री प्रसाद पांढरे यांची उपस्थिती लाभली...


तसेच ठाण्याहून सायकलिंग करत आलेले लिजंट सायकलिस्ट बारसे सर... कुलथे सर आणि भुसारा सर... यांच्यामुळे मुलांमध्ये चैतन्य आले..

चारपाच किमी अंतरावरा वरून चालत येणाऱ्या मुलींना  सायकल मिळाल्याच्या आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून जात होता... त्याचे शालेय जीवन सुसह्य होणार होते... या शाळेतील विद्यार्थ्या मध्ये माझी सायकल ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली... त्यात मुलींनी  सायकलींची  बहारदार चित्रे काढली होती...

मुंबई ठाण्याहून आलेले सर्व सायकलिस्ट आणि आम्ही सायकल प्रेमींचे सर्व सहकारी सदस्य यांच्या साठी पिठलं भाकरी आणि खर्डा असा बहारदार दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम होता... तांदळाच्या तसेच नाचणीच्या भाकरीने जेवणात बहार आणली...

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनची संस्थापक प्रज्ञा म्हात्रे हिचे अथक परिश्रम खरोखरच वाखणण्यासारखे आहेत...

या फाऊंडेशन कडून उत्तरोत्तर असेच समाजोपयोजी कार्यक्रम होवोत हिच सदिच्छा...

मंगल हो... !!!

सतीश जाधव

Monday, July 24, 2023

भेट प्रेमळ मित्र चव्हाण साहेबांची

भेट प्रेमळ मित्र चव्हाण साहेबांची.     दि. २० जुलै २०२३

आज मुंबई महापालिका निवृत्त अधिकारी चव्हाण साहेबांना (८३ वर्ष) दादरच्या कोहिनूर टॉवर मध्ये भेटण्याचा योग आला. 

महापालिकेत विभाग अधिकारी म्हणून कार्यरत असताना... अधिकारापेक्षा प्रेमाने त्यांनी माणसे जोडली होती... कर्मचाऱ्यांच्या घरी जाणे... त्यांच्याकडे जेवणे... त्यांची सहकुटुंब चौकशी करणे... ह्या त्यांच्या गुणामुळे... आजही त्यांनी लोकांना जोडून ठेवले आहे... 

 परममित्र प्रविण मिस्त्री (७९वर्ष) माझ्या घरी आल्यावर... आवर्जून चव्हाण साहेबांच्या घरी भेटायला जाणे... हे मैत्रीचे निकोप नाते दर्शविते...

वयोमानानुसार आलेल्या आजारपणाला चव्हाण साहेब हसतमुखाने सामोरे जातात हे पाहून... त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रतीत होत होती... 

जीवनाच्या या पडावावर मित्रांना भेटणे... हा एक आनंद सोहळा असतो... दुखण्याच्या आजारपणाच्या जाणिवेतून... आनंदाच्या, प्रेमाच्या नेणिवेत नेणारा प्रशस्त राजमार्ग असतो... मग अशा निरपेक्ष भेटीगाठी पुन्हा पुन्हा व्हाव्यात... अशीच आस असते... हे मित्रांच्या निर्मळ हास्यावरून जाणवत होते...

साहेबांची काळजी घेणाऱ्या मृणाल वहिनी सुद्धा अतिशय खुश झाल्या होत्या... त्यांनी आम्हाला साहेबांसाठी बनविलेले पौष्टिक लाडू खायला दिले...

कमरेतून खाली वाकलेले चव्हाण साहेब... मैत्रीच्या मेरुदंडावर ताठ उभे आहेत... हेच त्यांच्या प्रेमळ हास्यातून प्रकट होत होते...

माझे सुद्धा मित्र झालेल्या चव्हाण साहेबांना आता निवांतपणे गप्पा मारायला येतो असे सांगून त्यांचा निरोप घेतला...

मिस्त्री कुटुंब आणि चव्हाण कुटुंब यांची झालेली भेट  त्या सर्वां बरोबर मला सुद्धा दीर्घकाळ स्मरणात राहील...

मंगल हो... !!!

Sunday, July 16, 2023

*विपश्यना "मरण मरण्याची कला"*

 *विपश्यना "मरण मरण्याची कला"*
 
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव नियंत्रण तसेच मानसिक व शारीरिक आजारांच्या नियंत्रणाकरिता योगासन आणि नियमित व्यायामाबरोबरच ध्यानधारणेची नितांत आवश्यकता आहे. 

या धावपळीच्या जीवनातील ताणतणाव, चिंता, दुःख यापासून मुक्ती मिळवून देणाऱ्या; शरीर व  मन निरोगी ठेवणार्‍या; सुख, मन:शांती, समाधान आणि आनंदाचा मार्ग दाखविणाऱ्या विपश्यना ध्यानधारणेचं अनन्यसाधारण महत्त्व  आहे. 

प्राचीन भारतीय परंपरेतील ऋषी हे शास्त्रज्ञ होते.  निसर्ग नियमाप्रमाणे कसे जगावे, अंतर्मन कसे निर्मळ करावे  याबाबत विपश्यना साधनेची आदर्श पद्धती त्यांनी विकसित केली होती. प्राचीन ग्रंथ ऋग्वेदात विपश्यनेचा उल्लेख आहे.

ऋषी मुनींनी विपश्यना ध्यान धारणेद्वारा मन निर्मळ करून समतोल मनाने उच्च अध्यात्मिक प्रगती साध्य केली होती. परंतु  ही विपश्यना विद्या काळाच्या ओघात भारतातून लुप्त झाली. 

भगवान गौतम बुद्धांनी सुमारे २५०० वर्षापूर्वी या विद्येचे पुनर्संशोधन केले. या विद्येद्वारे त्यांना वयाच्या ३५ व्या वर्षी निर्वाण अवस्था प्राप्त झाली.  मानव जातीच्या कल्याणाकरिता त्यांनी पुढील  ४५ वर्ष विपश्यना साधनेचा भारतात व भारताबाहेर  प्रसार, प्रचार केला. भगवान गौतम बुद्धांनी  विपश्यना ध्यानधारणेद्वारा संपूर्ण मनुष्य जातीचे कल्याण केले आहे. विपश्यना ध्यानधारणा लोककल्याणाचा जीवनदायिनी व मुक्तिदायीनी राजमार्ग आहे.

 भगवान गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे ५०० वर्षे ही विद्या संपूर्ण भारतभर मानवाच्या उत्थानाचे अखंड कार्य करीत राहिली. परंतु त्यानंतर मात्र ही विद्या भारतातून समुळ नष्ट झाली.  परंतु विपश्यना साधना गुरू-शिष्य परंपरेने ब्रह्मदेशात तिच्या मूळ स्वरूपात जतन करून ठेवण्यात आली होती.

ब्रह्मदेशात स्थायिक झालेले मूळ भारतीय वंशाचे प्रसिद्ध उद्योगपती श्री. सत्यनारायणजी गोयंका यांना या अद्भुत विद्येचा लाभ मिळाला.  ही विद्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, तसेच भारतातून लुप्त झालेली ही विद्या पुन्हा भारतात यावी अशी प्रेरणा त्यांना गुरूवर्य श्री ऊ बा खिन यांच्यामुळे मिळाली. 

श्री गोयंकाजींनी भारतात येऊन १९६९ पासून लहान लहान शिबिरांमधून जास्तीत जास्त लोकांना या विद्येचा लाभ देण्याचे कार्य सुरू केले. १९७६ मध्ये आचार्य गोयंकाजी यांनी  भारतात पहिले विपश्यना केंद्र नाशिक मधील इगतपुरी येथे सुरू केले. 
 
मानवाचा उद्धार करणारी जीवनदायिनी व मुक्तिदायिनी विद्या भारतात आणून व तिचा प्रचार, प्रसार  सर्व जगात करून श्री गोयंका यांनी मानव जातीवर फार मोठे उपकार केले आहेत. मानव जातीच्या कल्याणाकरिता त्यांनी ही साधना भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली आहे...
आजमितीस भारतात १०५ पेक्षा जास्त विपश्यना साधना प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यात महाराष्ट्रातील ३४ केंद्रांचा समावेश आहे.  जगाच्या पाठीवरील २५५ पेक्षा जास्त विपश्यना केंद्राद्वारे जीवनात मूलभूत परिवर्तन करणाऱ्या या विद्येचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत अव्याहतपणे पोहोचविण्याचे काम सुरू आहे. 
  
विपश्यना साधनेचा उद्देश:

प्रत्येक व्यक्ती ताणतणाव विरहित जीवन जगू इच्छितो. परंतु  आपले मन ताब्यात नसल्यामुळे तसेच मनात आसक्ती, द्वेष, क्रोध, मोह असल्यामुळे; सुखी, समाधानी आणि निरामय जीवन जगणे कठीण होते...

आपले मन आपल्या ताब्यात ठेवण्याकरिता पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे आपले मन निर्मळ असणे... त्यासाठी  मन एकाग्र करणे ही पहिली पायरी आहे... आपले मन ताब्यात असल्यास आपण नक्कीच शांततामय जीवन जगू शकतो.  विपश्यना साधनेद्वारे मन ताब्यात येऊन निर्विचार आणि निर्विकार होऊन क्रोध, आसक्ती, मोहापासून विमुक्त होते.

विपश्यना म्हणजे विशेष रूपाने पाहणे.  या ध्यानधारणा पद्धती मध्ये स्वभाविक श्वासाचे सजग तटस्थ मनाने सतत निरीक्षण करणे व त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या सूक्ष्म मनाने शरीरातील प्रत्येक अवयवातील संवेदनांचे (स्थूल व सूक्ष्म) क्रमवार निरीक्षण करत राहणे व त्याचवेळी संवेदनांची अनित्यता, नश्वरता व भंगुरता यांची सतत जाणीव ठेवणे.  ही आहे विपश्यना साधना...

ही साधना साधकांना दहा दिवसीच्या शिबिराद्वारे शिकविली जाते. या प्रशिक्षणाकरिता राहण्याची व जेवण्याची उत्तम व्यवस्था केली जाते. याकरिता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. साधकांनी दिलेल्या ऐच्छिक  दानातून शिबिरांची पुढील सत्रे आयोजित केली जातात. या प्रशिक्षणाकरिता नेमण्यात आलेले आचार्य देखील कोणतेही मानधन स्वीकारीत नाहीत. सेवा भावनेने ही साधना शिकविली जाते.

सकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत हे प्रशिक्षण चालविले जाते. या साधने दरम्यान १० दिवस आर्यमौन ठेवावे लागते. हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, नशा न करणे, ब्रह्मचर्यपालन हे पंचशील पालन करावे लागते.  या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी दोन महिने अगोदर ऑन लाईन बुकिंग करणे आवश्यक आहे...

प्रशिक्षणातील महत्त्वाचा भाग:

बहुतांश ध्यानधारणा पद्धती मध्ये मनाची एकाग्रता वाढविणे यावर भर दिलेला असतो. परंतु विपश्यना ध्यानधारणा पद्धतीमध्ये स्वाभाविक श्वासाचे निरीक्षण करता करता करता मनाची एकाग्रता वाढविणे व भटकणारे मन;  विचार व आठवणी यापासून परावृत्त करून शरीरातील संवेदनांची अनित्यता, नश्वरता व भंगुरता यांची सतत जाणीव ठेवणे आणि विकार विमुक्त ( क्रोध आणि लोभ विरहित ) निरामय जीवन जगणे हे शिकता येते... 

अंतर्मन निर्मळ व स्वच्छ करणे हा या कलेचा मुख्य उद्देश आहे. या क्रियेत क्रोध आणि आसक्ती हे मनाचे प्रमुख विकार व इतर सर्व प्रकारचे विकार हळूहळू दूर होत जातात. मन निर्मळ व स्वच्छ होऊन आपल्या ताब्यात येते. मानसिक आणि शारीरिक आजार व दुःख दूर होत जातात. मानवी मनात शांतता, स्थिरता व समाधान प्राप्ती होते...

विपश्यना एक शास्त्र:

स्थूलमानाने मनात चार प्रकारच्या प्रक्रिया घडतात 

जाणीव (विज्ञान) (Consciousness)- हा भाग  माहिती गोळा करणे व तिची नोंद करण्याचे काम करतो. परंतु त्याला कुठलीही लेबल देत नाही. 

आकलन (संज्ञा) (Perception)- जाणिवेने गोळा केलेल्या नोंदीची छाननी करून वर्गीकरण करून त्यांना योग्य ते लेबल लावणे. नोंदीचे योग्य-अयोग्य अनुकूल-प्रतिकूल असे मूल्यांकन येथे होते.

संवेदना (वेदना)(Sensation)-मिळालेल्या माहितीचे मूल्यांकन झाले की संवेदना सुखदायक किंवा दुःखदायक आहेत हे या भागाकडून ओळखले जाते.

प्रतिक्रिया (संस्कार) (Reaction)  जेंव्हा संवेदना सुखकारक असतात, तेंव्हा त्या अधिक हव्याशा वाटतात आणि दुःखकारक असतात, तेंव्हा त्या नकोशा वाटतात. अशाप्रकारे मन आसक्तीच्या व द्वेषाच्या प्रतिक्रिया करत असते, जे संस्कार बनविण्यास कारणीभूत असते.

उदाहरणार्थ आपल्या कानावर संगीत पडले तर पहिला भाग आपल्याला त्याची जाणीव करून देतो. दुसरा भाग ते आपल्या पूर्वीच्या अनुभवावर पडताळून पाहतो म्हणजे आकलन होते व ते आपल्याला आवडणारे गीत आहे असा ध्वनित अर्थ काढतो व पुढच्या क्षणी आपले मन सुखद संवेदनाच्या जाणीवेने भरून जाते हे तिसऱ्या भागाच्या कामामुळे घडते... व ते संगीत पुन्हा पुन्हा ऐकावे अशी इच्छा चौथ्या भागात निर्माण होते. ही  प्रतिक्रिया असते.

मन निर्मळ करण्याकरिता मनाच्या तिसऱ्या भागाचा अर्थात संवेदनांचे तटस्थ भावनेने पाहणे होय... प्रत्येक गोष्ट अनित्य / भंगुर /अशाश्वत समजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तटस्थपणे निरीक्षण करणे आवश्यक असते. ह्या प्रतिक्रिया नवीन संस्कार बनविण्याचे कार्य करीत असतात. तटस्थ भावनेने निरीक्षण केल्याने नवीन संस्कार निर्माण होऊ शकत नाहीत व जुने संस्कार ध्यानधारणेच्या नियमित तटस्थ साधनेमुळे हळूहळू नष्ट होत जातात व मन शुद्ध होत जाते. 

स्वभावाला औषध नसते असे म्हणतात. परंतु ही साधना नियमितपणे केल्यास स्वभावात नक्की परिवर्तन येऊ शकते हा अनेक साधकांचा अनुभव आहे.

फायदे:

विपश्यना ही अंतर्मनात परिवर्तन करणारी भारतीय पुरातन साधना असून हजारो वर्ष ऋषी, मुनी, साधू, संत यांनी ही साधना निरामय जीवन जगण्यासाठी उपयोगात आणली असून या साधनेद्वारे अध्यात्मिक उंची गाठली आहे. 

विपश्यना साधनेचा नियमित सराव केल्यास त्याचे खूप चांगले व सकारात्मक परिणाम दिसून येतात. या धकाधकीच्या व ताण-तणावाच्या जीवनात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकविण्याकरिता मनाची शांतता व समाधान प्राप्त करण्याकरिता विपश्यना साधना अत्यंत उपयुक्त आहे. त्याबरोबर ही जीवन जगण्याची एक कला असून आध्यात्मिक उंची गाठण्याचा एक राजमार्ग आहे... त्यामुळे  सुख व समाधानी जीवनात उत्तरोत्तर वाढच होत जाते..

मानवी बाह्यमन व अंतर्मनात सतत संघर्ष चालू असतो. त्यामुळे निर्णय प्रक्रिया जलद होत नाही व ताण तणाव निर्माण होतो. विपश्यना साधनेचे प्रशिक्षण पूर्ण करून या साधनेचा नियमित सराव केल्यास मनाची शक्ती एकत्र होते. निर्णय प्रक्रिया जलद होते. मन निर्मळ झाल्यामुळे कुठलाही संशय/संदेह मनात राहत नाही.

ह्या साधने द्वारे आपले मन नेहमीच सजग व वर्तमानात असल्यामुळे आपल्याला मानसिक आजारांपासून दुर ठेवते. आपण नियमितपणे ही साधना केल्यास मनोविकारापासून निर्माण होणारे सर्व आजार तसेच  मुख्यत्वे रक्तदाब, शुगर, हृदय विकार, कॅन्सर मायग्रेन, अर्धांगवायू, ब्रेनस्ट्रोक यासारखे गंभीर आजारांपासून दूर ठेवतो..

विपश्यना साधना  सखा, मित्र, सोबती म्हणून आयुष्याच्या अंतापर्यंत आपल्याला साथ देते. विपश्यना साधनेचा नियमित सराव केल्यास आसक्ति, क्रोध मोह, द्वेष, नकारात्मकता, हव्यास, आळस हे मनाचे दोष (विकार) कमी होत जातात...  सुख, आनंद, मनशांती, सद्भावना, करुणा, मैत्री भावना, सकारात्मकता, उत्साह हे गुण वाढीस लागतात.  मनाचे व शरीराचे व्यवस्थापन करून तुम्हाला सुखी व समाधानी बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही विपश्यना साधना आहे. 

माणसाच्या जीवनात व अंतर्मनात परिवर्तन करू शकणारी अशी ही विद्या आहे.  नियमित साधना करून कित्येक लोकांनी त्यांच्या शारीरिक व मानसिक व्याधींपासून मुक्तता मिळविली आहे. त्याचबरोबर  ताणतणाव मुक्त आनंदी व समाधानी जीवन जगत आहेत. 

 आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी सुरू केलेल्या व जगाच्या पाठीवर सर्वत्र प्रसार झालेल्या विपश्यना साधनेत केवळ मानव जातीचा उद्धार, कल्याण व सर्वांचे मंगल व्हावे हा उद्देश आहे. त्यामुळे जगातील सर्व जाती धर्माचे लोक गेल्या ५४ वर्षांपासून विपश्यना साधनेचा लाभ घेत आहेत...  
 
द्वेष, क्रोध, भीती, आसक्ती, मोह, सूडाची भावना व ताण- तणाव दूर करण्याकरिता व मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता लाखो लोकांना या साधनेचा फायदा झाला आहे.  मानवाची दुःखातून संपूर्ण मुक्ती हा या साधनेचा उच्च अध्यात्मिक हेतू आहे...

अत्त दिप भव:  अर्थात स्वतःचे मार्गदर्शक स्वतःच बना, असे भगवान गौतम बुद्धांनी प्रतिपादन केलेले आहे. स्वत: अनुभूती घ्या व स्वत:ला अनुभव आला तरच विश्वास ठेवा... भगवान गौतम बुद्धांचा हा दृष्टीकोन अतिशय शास्रीय आहे...

 विपश्यना साधनेमुळे जीवन जगण्याच्या कले बरोबर मरण मरण्याची कला सूद्धा अवगत होते... नियमित विपश्यना करणारा साधक मरणाला सहजपणे सामोरा जातो... मूर्च्छित अवस्थेत साधकाचे प्राणोत्करण होत नाही...
 
एकटेपणात वृद्धापकाळात अगदी अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देणारा... आत्मविश्वास व समाधान देणारा... तुमचे कल्याण करणारा... विपश्यना हा राजमार्ग आहे.

 चला... आपण या प्राचीन भारतीय विद्येच्या साह्याने आपल्या मनाचे व शरीराचे व्यवस्थापन करूया...  या विद्येचा लाभ घेऊन ताणतणाव मुक्त, आनंदी, समाधानी आणि निरामय जीवन जगू या.

मंगल हो...

सतीश जाधव...
माहिती संकलित

Sunday, July 2, 2023

पावसातील...थरारक दिंडीगड सायकल राईड...

पावसातील...थरारक दिंडीगड सायकल राईड...

दिंडीगडचा दोन किमीचा अवघड घाट... एका दमात कुठेही न थांबता चढणे.. हाच निग्रह मनाशी करून आजची राईड आयोजित केली होती... 

दिंडीगडचा रस्ता अतिशय छोटा आणि समोरून गाडी आली तर सायकल वरून उतरणे अपरिहार्य होते... त्यात रात्री मित्राचा फोन आला... दिंडीगडचा रस्ता खूप खराब आहे... जागोजागी तुटलेला आहे... त्यामुळे स्वतःला दिलेले चलेंज आणखी खडतर झाले होते... 

मुंबई वरून पन्नास किमी राईड करून दिंडी गड पायथ्याला पोहोचलो... वड पारंबी खेळताना लटपटलो होतो...

सोबत अकरा सायकालिस्ट मित्र...  तगडे गडी आणि नव्या दमाचे होते... सर्वांना  रस्त्याची कल्पना दिली आणि सांगितले आता प्रत्येकाला स्वतःचा इंड्युरंस तपासता येईल... 

घाट सुरु झाला आणि प्रत्येक जण जोर लावून घाटावर चढण्याचा प्रयत्न करू लागला... आज शारीरिक ताकदी बरोबर मानसिक ताकदीचा कस लागणार होता... आणि झालेही तसेच... कुठेतरी मानसिक निग्रह कमी पडला... काही जणांचे पुढचे चाक वर उचलल्यामुळे थांबत होते... काही जणांची दमछाक झाली होती... आणि सर्वजण मागे पडले... 

सायकलच्या हॅण्डलवर टूल बॅग आणि स्पीकर लावला असल्यामुळे सखीचे पुढचे चाक उचलले गेले नाही...  शेवटी असलेला एकांडा शिलेदार कासवाच्या गतीने कुठेही न थांबता पुढे जात होता... दोन तीव्र अवघड वळणावर सखी लटपटली... पण जोरात ओरडून तिला सावध केले... प्रचंड दमछाक झाली होती... पण दुर्दम्य आत्मविश्वास होता... संपूर्ण लक्ष पुढील चाकावर केंद्रित करून गियर एक x एक वर ठेऊन सुध्दा झिकझाक सायकलिंग सुरू होते... 

एखादं कार्य  जेव्हा मन लाऊन आणि निग्रहाने करतो... तेव्हा ब्रम्हांडातील सर्व दृश्य-अदृश्य शक्ती त्या कार्याच्या सफलतेसाठी सक्रिय होतात...याची प्रचिती आली...

टॉपला असणाऱ्या  दिंडीगड महादेव मंदिराच्या  पायरीला सखीच्या चाकाचा स्पर्श झाला... आणि सखी विसावली...

वरून पाऊस आणि अंगातून घामाच्या धारांनी अंग थबथबले होते... गडाच्या पायरीवरच आडवा झालो... खडतर निग्रहाने... अतिशय खराब आणि छोटेखानी रस्ता असताना सुद्धा...  तो दोन किमीचा अवघड आणि खडतर घाट कुठेही न थांबता चढून जाण्याचे बळ पांडुरंगानेच दिले होते... 

महादेवी मंदिराजवळ असलेल्या धबधब्यात घुसलो... आणि राईडचे सार्थक झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता...

प्रत्येकाने प्रचंड एन्जॉय केली होती आजची दिंडीगड राईड... पावसाळी डोंगराळ राईडसाठी MTB सायकलच का हवी याची कल्पना सर्वांना आली...

भर पावसातील 102 किमीची थरारक दिंडीगड राईड... आज सकाळी 3.45 वाजता सुरू झाली होती आणि सायंकाळी 4 वाजता पूर्ण झाली... 

हिमालय सायकलिंगच्या तयारीची ही पहिली पायरी होती... 

मंगल हो...!!!

सतीश जाधव

Wednesday, June 28, 2023

बेधुंद पावसाळी राईड


बेधुंद पावसाळी राईड

रंगबिरंगी  दिवस होता... वातावरण मदहोश करणारे होते... कारने बोरिवलीला लग्नाला जातानाच... पावसाचे प्रताप सुरू झाले... तेव्हाच ठरविले आज पावसात राईड करायची.. बेधुंद भिजण्यासाठी...

धुवाधार पावसाची सायंकाळ आली... आणि तेव्हढ्यात नवनीतचा फोन आला... चला पावसात सायकलिंग करायला... मनातले मित्राच्या ओठावर आले... आणि सखी निघाली भिजायला... पावसाचे गाणे गायला....

तुडुंब पावसात सखीवर स्वार झालो... सखी शिरशिरली... बावरली... मोहरली... आणि मग सरसावली... दिलं पाण्यात झोकून... 

नवनीतसह स्वारी निघाली नरिमन पॉइंटला... जलाधरांनी अंग अंग झाले ओलेचिंब... पाण्याचे फव्वारे काढत सुसाटत धावत होतो... चष्म्या वरून ओघळणाऱ्या जलबिंदूना जिभेच्या टोकावर घेऊन दिमाखात हवेत उडवत होतो... भन्नाट  गेलो NCPA कडे... बसलो कठड्यावर सागराची गाज ऐकत... पाऊस पडतच होता... किनाऱ्यावरून चालणारी मंडळी छत्र्या रेनकोटचे अस्तर घेऊन पावसाला थोपावत होते... भिजण्यात काय मजा असते... हे त्यांना कोण सांगणार... 

तिकडून निघालो गेट वे ऑफ इंडियाकडे... वरचे टप नसलेली मुंबई दर्शनची रिकामी बस सखीकडे टकमक पाहत होती... दीडशे रुपयात साऊथ मुंबई फिरविणारी बस आज ताज हॉटेलच्या समोर निवांत विसावली होती... 

भर पावसात फोटो काढले... आणि आलो ऑपेराहाऊसच्या तिवारी स्वीटकडे...नवनीतने मस्त ट्रीट दिली...दोघात एक स्टफिंग केलेली जंबो दही कचोरी खाताना सायकल मैत्रीण शुल्लुची आठवण झाली... 

नाना चौकातून हाजी अली कॉर्नरला आलो... स्कूटर वरच्या दोन तरुणांनी भिजताना पाहिले... पुढच्याने रेनकोट घातला होता तर मागचा छत्री घेऊन बसला होता... विचारले... "पावसात भिजताय"... होय सखिसह मस्त भिजतोय... ठरवूनच घरातून बाहेर पडलोय... बालपणीच्या आठवणी ताज्या करण्याचा हाच तर रामबाण उपाय आहे... 

सिग्नल सुरू होण्या अगोदर स्कूटरस्वाराने रेनकोट उतरवला... मागच्याने छत्री बंद केली... आणि रममाण झाले पावसात... 

आनंदाचा झरा कसा बेधुंद असतो... याची प्रचिती आली... आजची चौतीस किमी राईड सार्थकी लागली होती...

सतीश जाधव...



Sunday, June 25, 2023

सायक्लोथॉन २०२३

मध्य मुंबईत प्रथमच मनसे सायक्लोथॉन २०२३ वारीचे आयोजन करण्यात आले होते... मनसे मा. नगरसेवक श्री संतोष धुरी यांच्या मार्फत... 

या वारीचे स्लोगन होते... सायकल स्पर्धा नव्हे... पर्यावरण अभियान आहे... प्रदूषण टाळा आणि निसर्ग वाचवा... कार, मोटारसायकल, स्कूटरच्या ऐवजी जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवून शरीर स्वास्थ्याबरोबर पर्यावरण स्वास्थ्य राखणे ही काळाची गरज आहे...

सकाळी  साडेपाच वाजल्या पासूनच आदर्श नगरातील वेल्फेअर सेंटर मैदानावर सायकल प्रेमी जमायला सुरुवात झाली होती... पावसाचा शिडकावा सुरू असल्यामुळे मस्तपैकी आल्हाददायक वातावरण होते... बाहेरून येणाऱ्या सायकल वीरांना बिब वाटपाचे काम सुरू झाले होते... एका बाजूला सेल्फी पॉइंट सुद्धा बनविण्यात आला होता... ठाणे, घोडबंदर, ऐरोली, घणसोली विरार येथून सायकल वीर या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते...

 मनसे नेते श्री संदीप देशपांडे यांनी स्वतः सायकल चालवून   सकाळी साडेसहा वाजता या सायकल वारीची सुरुवात करून दिली...

चार वर्षाच्या बाळगोपाळापासून ते एकाहत्तर वर्षाच्या तरुणांपर्यंत जवळपास पाचशे सायकलिस्टनी या वारीत भाग घेतला होता... विशेष म्हणजे महिलांचा सहभाग सुध्दा लक्षणीय होता... 

आयोजकांनी जाहीर केले की ही सायकल रेस नाही... त्यामुळे प्रत्येकाने मजेत रमतगमत... पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत... फोटोग्राफी करत या सायकल वारीचा आनंद लुटावा... या सायकल सफरीत सावरकर  स्मारक प्रतिष्ठान, प्रभादेवी डिकॅथलॉन येथे हायड्रेशन पॉइंट ठेवण्यात आले होते... तसेच जागोजागी मनसेचे कार्यकर्ते मार्ग दाखविण्यासाठी झेंडे घेऊन सज्ज होते... 

 पहिल्या पावसात सायकल चालविण्याची मजा काही औरच असते...
शिवाजी पार्क मैदानातील नाना नानी उद्यानाजवळ रंगीबेरंगी छत्र्या टांगून ठेवण्यात आल्या होत्या... जणूकाही आकाशात रांगोळी काढण्यात आली होती...

 चार वर्षाचा पार्थ रेनकोट घालून सायकल चालवत होता... त्याने नंतर रेनकोट काढून पावसाचा आनंद घेतला... काही वयस्क महिलांनी तर प्रथमच या वारीत भाग घेतला होता... उत्साहाच्या भरात तरुण मंडळी तर सुसाटत निघाली होती... 
 
सिद्धिविनायक मंदिराकडून प्रभादेवी डिकॅथलॉन जवळ आल्यावर तेथे एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली होती... तेथून वरळी चौपाटीवर वारी वळवली होती...  ॲट्रिया  मॉलच्या पुढे वळसा मारून पुन्हा वरळी चौपाटीला आली .. बरेच सायकल वीर वरळी चौपाटीवर सीलिंकच्या लोकेशनवर फोटो काढत होते...तेथून सायकल वारीने आदर्श नगरात प्रवेश केला आणि १५ किमी वारीची सांगता झाली...

वेल्फेअर मैदानाच्या दरवाजात सर्वांना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले... तसेच सर्व सायकल वीरांना लकी ड्रॉ कूपन देण्यात आले... या वारीत भाग घेतलेल्या सर्व सायकल प्रेमींसाठी कांदापोहे उपमा केळी आणि चहाचा अल्पोपहार होता...

मनसे नेते संदीप देशपांडे आणि मा. नगरसेवक संतोष धुरी यांच्या मार्फत... वारीत भाग घेतलेल्या बाल वीरांना भेटवस्तू देण्यात आल्या... विविध क्रीडा क्षेत्रात आणि विशेष म्हणजे ११०  मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून  भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहून जागतिक कीर्ती मिळविलेले डॉ आनंद पाटील या सायक्लोथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते...

 तसेच दिव्यांग आणि अंध सायकल वीरांचा सन्मान करण्यात आला... या वारीत भाग घेतलेल्या वयस्क तरुणांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला...

नंतर सुरू झाली बक्षिसांची खैरात... प्रथम पंचवीस भाग्यवंतांना सायकल घंटी बक्षीस देण्यात आली त्यानंतर सायकल पंप विजेत्यांची नावे जाहीर झाली... पाठोपाठ सायकल लॉक, गॉगल आणि हेल्मेट विजेते जाहीर झाले... सायकलप्रेमी आणि सायकलिस्ट तुषार आंब्रे यांनी गॉगल्स स्पॉन्सर केले होते... शेवटी जाहीर झाले प्रथम बक्षीस... डिकॅथलॉन प्रभादेवी यांनी स्पॉन्सर केलेली सायकल... आणि त्या सायकलचा भाग्यवान विजेता होता... सुहास कोंडुसकर... 

अतिशय शिस्तबद्ध आणि सुनियोजित अशा या सायकल वारीसाठी खूप परिश्रम घेतले ते सचिन पारकर, अंबरीश गुरव, दापोली सायकल क्लबचे सदस्य आणि सर्व मनसे स्वयंसेवक यांनी... या सर्वांचे नगरसेवक संतोष धुरी यांनी विशेष आभार मानले...

सचिन आणि अंबरीश यांचा यथोचित गौरव केला... वरळी दादर आणि प्रभादेवी पोलिसांचे सुध्दा अतिशय मोलाचे सहकार्य लाभले या वारीला...

संपूर्ण मुंबईला भूषणावह असणारी ही सायकल वारी खूप मोठा संदेश देऊन गेली आहे सर्व जनतेला... 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकल चालवा... आणि निसर्गाच्या जवळ जाऊन शरीर स्वास्थ्य सुद्धा सुदृढ ठेवा...

आयुष्य हे सायकल चाविण्यासारखं असतं... तोल सांभाळायचा असेल तर सतत पुढे जात रहावं लागतं... हिच जीवन जगण्याची कला आहे...

माननीय श्री संतोष धुरी यांचे सायकल वारी आयोजनचे हे पहिले पाऊल सर्वांसाठी दिशादर्शक ठरणार आहे...

मंगल हो ... !!!

सतीश जाधव

Friday, June 16, 2023

जागतिक दर्जाची सायकल रेसिंग स्पर्धा... काश्मीर ते कन्याकुमारी

जागतिक दर्जाची सायकल रेसिंग स्पर्धा...
 काश्मीर ते कन्याकुमारी

काश्मीर ते कन्याकुमारी हे 3651  किमी अंतर सहा दिवस तेवीस तास आणि 39 मिनिटात पार करून जागतिक विक्रम  प्रस्थापित करणारे डॉ अमित समर्थ यांची आज भेट झाली... 

मोनिलच्या वांद्रे येथील बाईकइंडिया या सायकल शॉपी मध्ये असलेल्या टॉक शो मध्ये...

दररोज साधारण 550 किमी अंतर पार करत... दिवस-रात्रभरात फक्त एक तास झोप घेत ही सायकल रेस विक्रमी वेळात पूर्ण करून डॉ अमित यांनी  जागतिक सायकल क्षेत्रात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले आहे... 

 "रेस  अँक्रॉस अमेरिका" या सायकल रेसिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी एका सायकलिस्टला पन्नास लाख रुपये खर्च येतो... तर ह्या भारतीय स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला पाच लाख रुपये खर्च आला... 

या स्पर्धेत एकूण बारा स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील एक स्पर्धक साठ वयाचा होता... एक स्पर्धक सिंगल गियर सायकलिस्ट होता.. तर तीन स्पर्धक अपंग होते...  सर्वांनी नियोजित वेळेआधी यशस्वीरीत्या ही स्पर्धा पूर्ण केली...

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन अतिशय देखणे आणि नियोजनबद्ध होते... तसेच अमेरिकन स्पर्धेच्या तोडीसतोड होते... भारतीयांनी भारतीयांसाठी  भारताच्या भूमिवर आयोजित केलेली  स्पर्धा होती... ही प्रचंड अभिमानाची बाब आहे... 

BRM / SR / LRM / RAAM इत्यादी परदेशातील सायकल स्पर्धांना पर्याय म्हणून ही स्पर्धा अतिशय उपयुक्त असून भारतीय तरुणांना आणि रेसिंग सायकलिस्टना नवनवीन जागतिक विक्रम पादाक्रांत करण्याची एक सुसंधी उपलब्ध झाली आहे भारत भूमिवर... 

डॉ. अमितच्या मार्गदर्शनाखाली पुढील स्पर्धा नोव्हेंबर 2024 मध्ये असणार आहे... साठीच्या पुढील तसेच MTB रायडर्स सुद्धा या स्पर्धेत भाग घेऊ शकतात...

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी डॉ अमित समर्थ (मोबाईल नंबर 8956433351) यांचे मार्गदर्शन सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे...

तर सुरू करा तयारी... आणि मेक इन इंडियाच्या प्रयत्नांना हातभार लावा...

 मंगल हो

सतीश जाधव