Saturday, October 31, 2020

श्री भीमाशंकर सायकल वारी...दिवस पहिला

श्री भीमाशंकर सायकल वारी
मैत्रीची मांदियाळी.....

27 ते 29 ऑक्टोबर 2020

// दिवस पहिला //


सायकल वरून भारत भ्रमंती केलेल्या रमाकांत महाडीकची ओळख मागच्या जानेवारीमध्ये सायकल कट्टा कार्यक्रमाच्या अनुषंगाने झाली होती. त्यावेळी नुकतेच ते अरुणाचल प्रदेश सायकलिंग करून आले होते. "तुमच्या बरोबर सायकलिंग करायचे आहे" असे त्यांना म्हणालो होतो.

गेल्या आठवड्यात रामकांतचा फोन आला, भीमाशंकर  राईड करायची आहे. त्यांच्या बरोबर राईड करायला मिळणार याचा खूप आनंद झाला. तात्काळ होकार दिला. 

आदल्या दिवशी सोमवारी समर्पयामि शॉपीमध्ये माझ्या सायकलचे ओपन सर्व्हिसिंग होते.  तेव्हा  रमाकांत खास मला भेटायला येऊरला आले होते. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे असलेले रमाकांत सायकल क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व आहे.  पूर्वाश्रमीचा ट्रेकर असलेला रमाकांत आता सायकलिस्ट झाला आहे. आम्हा दोघांच्या व्हेव लेंथ एव्हढ्या जुळल्या की अहो रमाकांत, वरून अरे रमाकांत कधी झाले कळलेच नाही.

 सोबत काय काय घ्यायचे, तसेच रात्री सुद्धा राईड करावी लागेल, त्यामुळे वेळेला शाळा, मंदिरात झोपावे लागेल. त्यासाठी मॅट आणि स्लीपिंग बॅग तसेच चांगल्या प्रतीचे लाईट्स घ्यावे लागतील, याची कल्पना रमाकांतने दिली. मनाची तयारी झाली होतीच,  आता सामानाची सुद्धा तयारी केली. 

मंगळवारी, सकाळी साडेतीन वाजता उठून स्वप्नाने दुपारच्या जेवणासाठी भाजी पोळी करून दिली. तासाभरात तयार होऊन साडेचार वाजता घर सोडले. सर्व सामान पॅनियर बॅगेत व्यवस्थित राहिले. पाठपिशवीत पाण्याची पोटली जेवणाचा डबा आणि फळे ठेवली होती. सोबत संगीत बाजा सुद्धा होता. 

परेल वरून पहिली लोकल पकडून सकाळी सहा वाजता कळवा स्टेशनला पोहोचलो. सुहास्य वदनाने रमाकांतने स्वागत केले. डॉ. राजेश आम्हाला चियर अप करण्यासाठी स्टेशन जवळ आला होता. आमच्या सोबत तो कल्याण पर्यंत राईड करणार होता. 

आता सुरू झाली भीमाशंकर राईड... बराच मोठा पल्ला होता... दुर्दम्य इच्छा शक्ती होती... आणि दोस्तांची साथ होती... विशेष म्हणजे सोलो रायडर रमाकांतच्या अनुभवाची जोड मिळणार होती. एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती. 

कळवा ते कल्याण हा पहिला टप्पा होता. कळवा नाक्यावरून आम्ही तिघे पूर्व द्रुतगती मार्गावर आलो. खरेगाव टोल नाका सोडल्यावर जोरदार स्प्रिंट सुरू झाली. खाडीचे वारे वाहत होते. हायवेला वाहनांची वर्दळ होती. आमचा जोश सुद्धा प्रचंड होता. तासाभरातच कल्याण मुरबाड क्रीक ब्रिज ओलांडून दुर्गाडी, कल्याण जंक्शन जवळ पोहोचलो. येथे रमाकांतची सायकलिस्ट मैत्रीण ममता परदेसी आम्हाला चियर अप करायला डोंबिवली वरून आली होती.

 लॉकडाउन अगोदर हीच भीमाशंकर राईड ममताने रमाकांत बरोबर केली होती. त्यावेळच्या गमती जमती भरभरून सांगत होती. कल्याणच्या संतोषीमाता मार्गावर एका टपरीवर चहा प्यायला थांबलो. 

येथे सर्पमित्र दत्ता बोंबेची भेट झाली. मोटारसायकल वरून गावाला निघालेला दत्ता आम्हाला चहा टपरीवर पाहून थांबला. आम्ही भीमाशंकर राईडला निघालोय हे ऐकून एकदम खुश झाला. चहा पिता पिता दत्ता त्याचे ट्रेकिंग, सायकलिंग आणि सर्पांच्या सहवासाने अनुभव सांगू लागला. गम्मत म्हणजे पहिल्या भेटीतच ममता आणि दत्ता माझे खास मित्र झाले होते. ट्रेकर्स, सायकलिस्ट आणि निसर्गप्रेमी यांची जातकुळी एकच असते, याचा प्रत्यय आला.

पुढे शहाड स्टेशन रोड फाट्यावर थांबलो. बगळ्यांच्या स्टॅच्यू जवळ दत्ताने आम्हा चौघांचे फोटो काढले. येथेच योगीधाम मध्ये माझा मित्र भास्कर इसामे राहतो. त्याला आठवणीने फोन केला आणि भीमाशंकर राईड करतोय हे सांगितले. भास्कर म्हणाला,  मुरबाडच्या पुढे शिवळे गावात माझे घर आहे. तेथे आई बाबा आहेत. आईला तुमच्या न्याहारीची व्यवस्था करायला सांगतो. भास्करच्या बोलण्याने खूप आनंद झाला. पुढचा पडाव शिवळे गावात नक्की केला. मुरबाडला  राहणाऱ्या हरीश गगेला सुद्धा फोन केला. तो कामावर जाण्यासाठी कल्याण स्टेशनला पोहोचला होता. त्याने आम्हाला सायकलिंग करताना ओझरते पाहिले होते. राजेश आणि ममताला निरोप देऊन आमची राईड सुरू झाली.

सकाळचे साडेसात वाजले होते. ऊन वाढायला सुरुवात झाली होती. सेंच्युरी रेयॉन कंपनी जवळ रस्त्याचे काम सुरू होते. त्यात डंपर आणि ट्रक यांची रहदारी होती. त्यामुळे खणलेल्या रस्त्यावरूनच राईड सुरू होती. म्हारळ गाव सोडल्यावर मस्त डांबरी रस्ता सुरू झाला. आता मुरबाडच्या दिशेने राईड सुरू झाली. 

माळशेजच्या या रस्त्यावरून माझी चौथी राईड होती. पण या वेळी माझ्या समवेत अतिशय माहितगार आणि सायकलिंग मधील बापमाणूस रमाकांत साथीला होता. तसेच तो रोडिओ सायकल वरून ही राईड करत होता. त्यामुळे त्याच्या बरोबरीने mtb वरून राईड करण्यासाठी माझा कस लागत होता. सरळ रस्त्यावरून त्याच्या बरोबरीने सायकल चालविणे जमत होते. पण चढाला मी मागे पडत होतो. ही कसर उताराला भरून काढत होतो. खरंच या वेळी माझ्या सायकलिंगची सत्व परीक्षा होती. आम्ही दोघेही एकमेकांसाठी नवीन होतो. रमाकांतचे जलद रायडिंग स्तिमित करणारे होते तर माझा आत्मविश्वास सुद्धा प्रचंड होता. त्यामुळे कधी तो पुढे कधी मी पुढे असा लपंडाव सुरू होता. 

वाढते ऊन, हेड विंड आणि वेगवान सायकलिंग ही माझी इंड्यूरन्स टेस्ट होती. आज पट्टीच्या सायकलिस्ट बरोबर मी सायकलिंग करत होतो, हे माझे भाग्यच होते. माझीच परीक्षा मीच घेत होतो. रमाकांतचे सायकल वरील स्पिनींग अतिशय लयदार होते. जुन्या रेल्वेच्या वाफेच्या इंजिनच्या शाफ़्ट प्रमाणे सतत त्याचे पाय पेडलवरून फिरत होते. 

दोन तासात चाळीस किमी अंतर पार करून आम्ही शिवळे गावातील भास्कर इसामेच्या फार्म हाऊसवर गेलो.  दत्ता बोंबे मोटार सायकल वरून शिवाळे गावाच्या मंदिराजवळ आमची वाट पाहत थांबला होता. त्याला सुद्धा भास्करच्या घरी घेऊन गेलो. 

बाबांनी आमचे स्वागत केले. आईने भाकऱ्या आणि कडवे वालाची उसळ अशी फार्मास न्याहारी केली होती.  सोबत उडदाच्या पापड्या होत्या. भरपेट नास्ता केल्यावर आईने गवती चहाची पात घालून केलेला मसालेदार चहा आम्हा तिघांना दिला. श्री भीमाशंकराच्या आधी आई बाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. दत्ताने आमचा गृप फोटो काढला.

  बाबांनी माझा फोन नंबर घेतला आणि कधीही या रस्त्याने जाणे झाले तर घरी जरूर या असे आमंत्रण दिले. या पाहुणचाराने आम्ही भारावून गेलो. विशेष म्हणजे दोन तासापूर्वीच ट्रेकर सायकालिस्ट आणि सर्पमित्र दत्ताची ओळख झाली होती. पण तो आता भास्करच्या आई बाबांचा सुद्धा परिचित झाला होता.  ट्रेकर आणि सायकलिस्ट भास्करला भेटण्याची इच्छा त्याने प्रकट केली. 

देवदर्शना अगोदर आई बाबांचे दर्शन घेतले. तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन माळशेज घाटाकडे सायकलिंग सुरू केले. दत्तासुद्धा आम्हाला रामराम करून मोटारसायकलने त्याच्या गावी निघाला. आता माळशेज पायथ्यापर्यंत भराभर पोहोचायचे टार्गेट होते.

वाटेतील इंदे गावाजवळ जिव्हाळा प्रतिष्ठानचे फार्म हाऊस आहे. माझा शाळकरी मित्र  संजय कोळवणकर त्याचा तहहयात ट्रस्टी आहे. जानेवारी महिन्यात या फार्म हाऊस वर आम्ही सर्व शाळकरी मित्र सहकुटुंब गेलो होतो. त्याची आठवण झाली. संजयला सरप्राईज द्यायचे म्हणून जिव्हाळा प्रतिष्ठनच्या बोर्ड जवळ थांबून आम्ही फोटो काढत होतो, तेव्हढ्यात फार्म हाऊसचा केअर टेकर लक्ष्मण समोर आला आणि म्हणाला, ' साहेब, ओळखलं तुम्हाला, चला नास्ता चहा घ्यायला' त्याला प्रेमाने भेटून आज बराच मोठा पल्ला आहे सांगून लक्ष्मणचा निरोप घेतला. 

ऊन आणखीनच तापले होते. छोटे मोठे चढ उतार सुरू झाले. मोरोशी जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला. केळी खाल्ली. समोरच भैरवगड दिसत होता. बरीच ट्रेकर्स मंडळी गाड्यांनी येथे येऊन भैरवगड ट्रेक करतात. दुपारचे ऊन चढले होते. यातच घाट चढायचा होता. पण इच्छा शक्ती दुर्दम्य होती. त्यामुळे सर्व अडचणींना सामोरे जाण्याची प्रचंड तयारी होती.

दुपारी दोन वाजता सावरणे गावात पोहोचलो. त्यातही छोट्या हॉटेलमध्ये स्वप्नाने दिलेल्या चिकन सॉसेजेस भाजी पोळीवर ताव मारला. संत्र आणि सफरचंद फलाहार केला. आता भर उन्हात घाट चढायला सज्ज झालो. येथून  बारा किलोमीटर्सचा माळशेज घाट सुरू होतो. पाण्याचा बाटल्या आणि पोटल्या भरून घेतल्या. 

सुरू झाली माळशेज घाट चढाई. थोड्याच वेळात रमाकांत पुढे सरकला. संपूर्ण घाट दमदारपणे चढण्यासाठी एका विशिष्ठ वेगाने मी पेडलिंग करत होतो. आज संपूर्ण लक्ष सायकलिंगकडे केंद्रित करून स्पिनींग करत होतो. गियर रेशीओ एक तीन लावून घाट चढायचे नक्की केले होते. मध्ये मध्ये अबोली,शतावरी, सोनकी अशी फुलांची नावे दिलेले रेस्ट पॉईंट होते. परंतु जेथे रमाकांत थांबला असेल तेथेच थांबायचे हे मनाने ठरविले. एकदा का मानसिक तयारी झाली की शरीरसुद्धा त्याला सपोर्ट करते. पेडलिंग करतानाच पोटलीतले पाणी पिणे सोपे झाले होते. त्यामुळे न थांबता कासवाच्या पावलाने सायकलिंग सुरू होते. घाटाच्या अर्ध्या रस्त्यात शतावरी रेस्ट पॉईंट जवळ रमाकांत आडवा झाला होता. मला पाहून त्याने चिअर अप केले. मनाबरोबर खेळलेला पहिला डाव जिंकला होता. घाट सुरू झाल्यापासून कुठेही न थांबता अर्धा रस्ता पार केला होता. मस्त पैकी खजूर, संत्र, सफरचंद, कंद आणि ममताने दिलेली चिक्की खाऊन चक्क पंधरा मिनिटांचा हायड्रेशन ब्रेक घेतला. 

पुढची सफर सुरू झाली. माळशेज बोगद्यात पोहोचलो. येथे फोटो साठी अतिशय सुंदर लोकेशन होते. बोगद्यातून आत शिरताना बोगद्यातून येणाऱ्या प्रकाश किरणांच्या बॅकराऊंडवर सायकलिंग करतानाचे फोटो काढले. 

बोगद्याच्या काळ्या कभिन्न दगडावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या वेगवेगळ्या छटा दिव्यत्वाची प्रचिती देत होत्या. तर रामकांतचा फोटो अंधारातून प्रकाशाकडे जाणारा होता. 

"दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती" ही अनुभूती मन मंदिरात साठवून पुढची सफर सुरू केली. बरोबर पाच वाजता माळशेज घाटाच्या टॉपला पोहोचलो. पायथ्या पासून  mtdc च्या गेट जवळ यायला अडीच तास लागले होते.  होर्डिंग जवळ फोटो काढले आणि पुढे प्रस्थान केले. 

माझा सायकलिस्ट मित्र, खेडच्या अजित गायकवाडला पाच वाजे पर्यंत जुन्नरला येतो असे सांगितले होते. परंतु वेळेचे गणित चुकले होते. 

पुढचा हायड्रेशन ब्रेक करंजळा येथे  शिवशम्भो टी सेंटरकडे घेतला. कोटमाई जलाशयाच्या बाजूलाच  स्वस्तिक बोटींग सेंटर आहे. तेथे टेंटिंगची सुद्धा व्यवस्था आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये माळशेज घाटाच्या पठारावर पसरलेला हा जलाशय पाहणे म्हणजे पर्वणी होती. 

हरिश्चंद्रगडाचा परिसर पाहून, लाला लजपतराय महाविद्यालयात असताना मी आणि शरद पाटील यांनी माझा कॉलेज वर्ग मित्र अरुण सावंत बरोबर १९७५ साली केलेला पहिला ट्रेक आठवला. त्यानंतर मुंबई महापालिकेत नोकरीला लागल्यावर  पहिल्यांदा केलेल्या हरिश्चंद्रगडाच्या आठवणी जागृत झाल्या. माझे ट्रेकिंगचे गुरू शिंदे, गीते आणि मिस्त्री यांची आठवण आली. मनपाच्या नायर रुग्णालयातील माझे सहकारी मित्र विचारे, रहाटे, शानभाग, अरवंदेकर, सावंत हे त्यावेळी साथीला होते. हरिश्चंद्रगड, कोकण कडा, शंकराचे देऊळ, गुहेतील पाण्यात असलेले शिवलिंग साऱ्याचा आठवणीने मन भावविभोर झाले. 

   रमाकांतने कोकणचा मेवा शेंगदाणा लाडू आणले होते. त्यावर ताव मारला फक्कड चहा घेऊन पुढची सफर सुरू केली. करंजाळे वरून वेळ खिंड ओलांडून,  गणेश खिंडीमार्गे जुन्नर एकवीस किमी वर आहे. दोन्ही घाट पार करून जुन्नरला पोहोचायला रात्रीचे आठ वाजणार होते. अजितला फोन करून जुन्नरला पोहोचण्याची वेळ सांगितली.
   
 वेळ घाट सहज पार झाला. गणेश खिंडीच्या पायथ्याला भला मोठा बोर्ड लावला होता. खिंडीत रस्त्याचे काम चालू असल्यामुळे गणेश खिंड बंद आहे, बनकर फाट्यावरून जुन्नरकडे जावे. जवळच काम करत असलेल्या गावकऱ्याकडे विचारणा केली असता कळले, दोन चाकी गाड्या जाऊ शकतील पण रस्ता अतिशय खराब स्थितीत आहे. अंधार पडायला सुरुवात झाली होती. बीमर लाईट लावून घाटाची चढाई सुरू केली. रमाकांत संधीप्रकाशात लाईट न लावता सायकल हाकत होता. खड्डे-खुड्डे, वेडीवाकडी वळणे, काही ठिकाणी खणलेले चर यातून गाडी चालविणे अतिशय जिकरीचे होते. त्यात वरून येणाऱ्या मोटरसायकलींचे प्रखर हेडलॅम्प डोळ्यावर अंधारी आणत होते. सर्व विपरीत परिस्थितीवर मात करून साडेसहा वाजता गणेश खिंडीच्या टॉपला पोहोचलो. बाप्पाचे दर्शन घेतले. बाप्पाला लाडवाचा प्रसाद दाखवून तो भक्षण केला. आता मिट्ट काळोख पसरला होता. 

 येथे रमाकांतने बीमर लाईट सुरू केला. भन्नाट उतारावर आणि खडबडीत रस्त्यावर सायकल माझी सायकल बेभान पळू लागली.  माझ्या mtb सायकलचे टायर २.२ चे असल्यामुळे घसरण्याची शक्यता बिलकुल नव्हती. पण रमाकांतची रोडिओ अतिशय सावधगिरीने गणेश खिंड उतरत होती. रस्त्याचे काम करणारे डंपर प्रचंड धुरळा उडवत होते. त्यामुळे गडद अंधारात बीमर लाईट रोडवर पडत नव्हती. गणेश खिंडीच्या जुन्नर कडच्या उतारावर वळणे कमी आहेत. तसेच मागच्या वेळेस याच बाजूने गणेश खिंड चढल्यामुळे रस्त्याची माहिती झाली होती. एक मोठा वळसा घेऊन पुढील वळणावर असलेल्या, 'क्षणभर विश्रांती' या हॉटेल जवळ रमाकांतची वाट पाहत थांबलो. मागच्या वेळेस या हॉटेलच्या बाहेर सिम्बल म्हणून बैलगाडीची एक चाक होते. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे, हॉटेल समोरून ते गायब झाले होते.  रमाकांत येताच क्षणभर विश्रांती घेऊन पिंपळगावकडे पुढची राईड सुरू झाली. मागच्या वेळेस लक्ष्मण नवलेच्या पिंपळगावाच्या आत्याच्या घरी भेट दिली होती. त्याची आठवण झाली. 

उतार संपून आता जुन्नरच्या वेशिजवळ आलो आणि चढाला सुरुवात झाली. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला नतमस्तक झालो. अंगात विशेष बळ संचारले आणि चढ सहज पार केला. बरोब्बर आठ वाजता आम्ही जुन्नर एस टी स्टँड जवळ पोहोचलो.  अजित पाहुण्यांसह जुन्नर कडे येत होता. 
आज जुन्नर पर्यंत १३६ किमीचा एक मोठा टप्पा पार केला होता. जोरदार भूक लागली होती, त्यामुळे जेवणाच्या हॉटेलची शोधाशोध चालू होती. तेव्हढ्यात अजित कार घेऊन पाहुण्यांसह प्लॅटिनम हॉटेल जवळ हजर झाला. माझा सायकलिस्ट मित्र अजित गायकवाडने साडूभाऊ श्री  मनोज फदाले साहेब (C R P F अधिकारी ) यांची ओळख करून दिली. सोबत मनोज भाऊंचे एकाच सोसायटीमध्ये राहणारे जिवलग मित्र श्री किरण वळसे यांची ओळख करून दिली. किरण भाऊ कुवेत मध्ये नोकरी करतात. तसेच दुसरे सायकलिस्ट मित्र  श्री  लक्ष्मण नलावडे यांची भेट झाली. 

माझ्या कन्याकुमारी सायकल राईडचे कप्तान सोपानराव नलावडे यांचे चुलत भाऊ लागतात. सर्वांची भेट पहिल्यांदाच होत होती. परंतु प्रथम भेटीतच सर्वजण माझे खास मित्र झाले होते. जसे की खूप जुने मित्र आहेत. प्लॅटिनम हॉटेल मध्ये जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे पुढे असणाऱ्या म्हणून सद्गुरू हॉटेलमध्ये जेवण घेतले. 

अजितचा आग्रह होता खूप उशीर तसेच अंधार झाल्यामुळे सायकल गाडीत टाकून पुढचा ३६ किमीचा प्रवास गाडीने करावा. परंतु रमाकांत आणि माझी, स्वतःशीच स्पर्धा आणि परीक्षा होती.  तसेच ठरविलेले ध्येय निश्चितपणे गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा ध्यास घेऊनच ह्या सायकलवारीची सुरुवात केली होती. त्यामुळे अजिताच्या या प्रेमाच्या आग्रहाला आव्हेरणे खूप जड गेले. 

रात्री ९ वाजता घोडेगावकडे पुढची राईड सुरू झाली. अजित कारने पुढे होऊन घोडेगाव फाट्याच्या पुढे जवळपास दोन किमी पर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होता. आमच्या भेटीसाठी ही मंडळी जेवण न घेता जुन्नरला आले होते. त्यांना पुढे जाण्यास सांगितले. घोडेगावकडे जाणारा रस्ता लहान परंतु सुस्थितीत होता. समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाईटला सामोरे जात दमदारपणे आमची राईड सुरू होती. दीड तासात घोडेगावला पोहोचलो. येथून ११ किमी वर स्क्विरल रिसॉर्ट होते. पुढचा चढाचा प्रवास अतिशय खडतर वाटत होता. परंतु जिद्द कायम होती. आम्ही दोघेही काहीही न बोलता जोडीने सायकलिंग करत होतो. शिनोली गावात पोहोचलो आणि अजितला फोन आला. 

येथें अजून दोन किमी पुढे जायचे होते. श्री भिमाशंकरचा मनात जयघोष करून अंतिम चढाईला सुरुवात केली. ही चढाई म्हणजे मनाबरोबर केलेली लढाई होती. थोड्याच वेळात डाव्याबाजूला डोंगरात  चमचमणाऱ्या लाईट्स दिसू लागल्या. सह्याद्रीच्या डोंगरात वसलेले अतिशय आलिशान असे स्क्विरल रिसॉर्ट आमच्या नजरेच्या टप्प्यात आले होते. शेवटचा पाचशे मीटर्सचा खडतर टप्पा पार करून स्क्विरल रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला. 

या रीसॉर्टचे वैशिष्ठ्य म्हणजे हे पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. आत मध्ये कोणत्याही वाहनाला प्रवेश नाही. परंतु मनोज भाऊंच्या प्रेमामुळेच आम्हाला सायकलसह प्रवेश मिळाला. बरोबर साडेअकरा वाजता आम्ही रिसॉर्ट मध्ये पोहोचलो होतो.
मनोज, किरण, लक्ष्मण आणि अजित आमची वाट पाहत थांबले होते. सायकलिंगच्या प्रेमाखातर माझ्यावर प्रेम करणारी, माझ्यासाठी एव्हढा वेळ देणारी माणसे निव्वळ श्री भिमाशंकराचा कृपेनेच माझ्या जीवनात आली होती. खरोखर खूप मोठे भाग्य आहे माझे. हॉटेलचे मालक आणि मनोजरावांचा भाचा कोकणे सुद्धा भेटायला आला होता. मुंबईवरून शिनोली पर्यंत  ४९०० फूट  उंची पार करून १७२ किमी सायकलिंग एका दिवसात  करून येणे त्याला अशक्य वाटत होते.  म्हणून तो उशिरापर्यंत जागा राहून  आम्हाला भेटायला आला होता. 

सर्वांसह फोटो काढले. रात्री हळद टाकून गरम दुधाची व्यवस्था झाली. स्क्विरल रिसॉर्टचा अँबियन्स, लोकेशन, सर्व कार्यक्रमासाठी  मध्ये असणारा ओपन लॉन्स, आलिशान रेस्टॉरंट, झाडात चमचमणाऱ्या LED लाईट्स हे सर्व पाहून आम्ही दिपून गेलो. 

आम्हाला दिलेला आलिशान सूट डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. फक्त आणि फक्त मैत्रिखतार अजितने जुन्नर मध्ये जेवणाची आणि स्क्विरल रिसॉर्ट मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. 

श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील खालील ओवी मला प्रत्यक्ष रीतीने आज आकळली... 

ती अशी...

वर्षत सकळमंगळीं । सायकल निष्ठांची मांदियाळी।।

अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ।।

सर्व प्रकारच्या मांगल्याचा  वर्षाव करणारे सायकलनिष्ठ मित्र पृथ्वीवर अवतरत जावोत आणि माझ्या सारख्या पामर प्राणिमात्राला भेटत जावोत. 

हे भाष्य आज मी सर्वार्थाने अनुभवले होते.

फ्रेश होऊन जम्बो बेडवर झोपेच्या अधीन कधी झालो ते कळलेच नाही.


सतीश जाधव
आझाद पंछी.....

Friday, October 16, 2020

सत्तीपट्टान विपश्यना

सत्तीपट्टान विपश्यना  

दि. ०२.०४.२०१९ ते १०.०४.२०१९

सतिपट्टान म्हणजे विपश्यनेचा सूक्ष्म अभ्यास. हा अभ्यास करण्याचा योग वरील कालावधीत धम्मगिरी, इगतपुरी येथे आला. हा अभ्यास करण्यासाठी दहा दिवस विपश्यनेचे पाच कोर्स करणे आणि एक वेळ दहा दिवस धम्म सेवक म्हणून सेवा देणे अनिवार्य आहे.


सति म्हणजे सजगता, जागरूकता  आणि
पट्टान म्हणजे प्रतिष्ठापन...

म्हणजेच "जागरूकतेचे प्रतिष्ठापन" याचा अर्थ आपण करत असलेल्या कर्माप्रती सतत सजग असणे...

विपश्यनेची चार स्मृती प्रस्थानें आहेत. त्याचा अभ्यास सतिपट्टानाच्या अनुषंगाने करता येतो.

कायानुपश्यना .... शरीराच्या अंगाने

वेदनानुपश्यना..... संवेदनांच्या अनुषंगाने

चित्तानुपश्यना ......  मनाच्या अनुषंगाने
आणि
धम्मानुपश्यना ..... धर्माच्या म्हणजेच निसर्ग नियमांच्या अनुषंगाने

विपश्यनेच्या या सूक्ष्म अभ्यासात,  आपल्याला, स्वतः बद्दलच्या जागरूकतेला अंतिम सीमेपर्यंत प्रतिष्ठापित करण्याचे काम करता येते. त्यामुळे आपल्या संबंधीचे (शरीर आणि मन) सर्व सत्य प्रकाशात येते. ते सुद्धा स्वतःच्या अनुभूतीने;  हे सर्व सत्य आपल्या साडेतीन हाताच्या कायेमध्ये प्रत्यक्ष ज्ञानाने प्रकट होते.

विपश्यना म्हणजे स्वतःला विशेष रीतीने पाहणे. याची सुरुवात  "आनापान" द्वारे होते. नाकपुड्यातून आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मन एकाग्र होते. त्या नंतर ह्या एकाग्र झालेल्या मनाला नाकपुड्याच्या खाली तसेच वरील ओठाच्या वर होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष देण्याची कामगिरी दिली जाते. हा अभ्यास सतत तीन दिवस केल्यावर चौथ्या दिवशी विपश्यना दिली जाते.

आनापानाची पुढील पायरी विपश्यना आहे. यामध्ये सूक्ष्म झालेले मन टाळूवर, ब्रम्हरंघ्रावर नेऊन तेथे होणाऱ्या संवेदना मनचक्षुने पहायच्या असतात. त्यानंतर मन संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवावर नेऊन तेथील संवेदना समता भावाने, स्थितप्रज्ञतेने पहायच्या.  सुखद किंवा दुःखद संवेदनावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. याद्वारे शरीरात आणि मनात चाललेल्या घडामोडींची अनुभूती होते. ही झाली विपश्यना साधनेची व्यवहार्य बाजू.

विपश्यना एक विद्या आहे, जिच्या नियमित साधनेमुळे आपण शांतीचे निरामय जीवन जगू शकतो.

अडीच हजार वर्षांपूर्वी "सिद्धार्थ गौतम" याने या विद्येचे पुनरुज्जीवन केले आणि विपश्यना साधना करून वयाच्या ३५ व्या वर्षी निर्वाण (अरहत) अवस्था प्राप्त केली. जन्म मरणाच्या भवचक्रातून तो मुक्त झाला, सम्यक संबुद्ध झाला. ही विद्या त्याने पुढील ४५ वर्ष सर्व मानव समाजाला वाटली. या कालावधीत हजारोनी निर्वाण अवस्था प्राप्त केली, तर करोडो गृहस्थाश्रमी आणि भिक्षुक, आसक्तीमुक्त आणि क्रोधमुक्त अवस्था प्राप्त करून सुखशांतीचे जीवन जगू लागले. ह्या विद्येचा प्रसार प्रचार भारतासह कंबोडिया, थायलंड, लाओस, श्रीलंका, ब्रम्हदेश या पूर्वेकडील देशात सुद्धा झाला.

त्या पुढील ५०० वर्षानंतर ही विद्या भारतातून लुप्त झाली. ब्रह्मदेशात हीच विद्या गुरुशिष्य परंपरेने तिच्या मूळ आणि शुद्ध रुपात टिकून राहिली. ही विद्या भारतात १९६९ साली पुन्हा श्री. सत्यनारायणजी गोयंका यांनी आणली आणि आता तिचा प्रचार प्रसार भारतात आणि भारताबाहेर सुद्धा होत आहे.

विपश्यनेचे पाहिले निवासी केंद्र इगतपुरी येथे १९७६ साली बांधले गेले. आता भारतात आणि जगभरात मिळून एकूण १८५ विपश्यना केंद्र आहेत. लाखो व्यक्तींनी विपश्यनेचा अभ्यास, साधना करून आपले जीवन सुख, शांतीमय केले आहे.

आपल्या जीवनात येणाऱ्या जवळपास ९९ टक्के व्याधी, आजार मनोविकारामुळे (सायको सोमॅटीक आजार) निर्माण होतात. डायबिटीज, रक्तदाब, मायग्रेन, हृदयविकार, अर्धांगवायू, ब्रेन हामरेज इत्यादी सर्व आजार मानसिक ताणतणावामुळे निर्माण होतात. जीवनात ताणतणाव निर्माण होण्याचे मुख्य कारण आसक्ती आणि क्रोध हे आहे. आसक्ती आणि क्रोध हे दोन्ही रिपू बाहेरील गोष्टीवर अवलंबून नसून ते आपल्या मनातच असतात; यांची जाणीव विपश्यना साधनेमुळे होते. त्यामुळे विपश्यना साधनेद्वारे आसक्ती आणि क्रोध या पासून मुक्तता मिळविता येते आणि जीवनात सुख, शांती, समाधान याची प्राप्ती होते.

स्त्री असो किंवा पुरुष, धनवान असो की गरीब, हिंदू असो की मुस्लीम किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही प्रांताचा असो की कोणत्याही देशाचा असो; प्रत्येकाला सुख समाधान आणि शांती हवी असते. हे सार्वजनिन त्रिकालाबाधित सत्य आहे.

प्रत्येकाला रात्रीची निवांत झोप हवी असते. पण असे घडते का? याचे मूळ कारण आहे, मानसिक अशांतता आणि ताणतणाव; तसेच आसक्ती आणि क्रोध.   विपश्यना जीवनात निर्माण होणाऱ्या दुःखातून बाहेर पडण्याची कला शिकवते. त्यामुळे आपण तर सुखी होतोच असेच  आपले कुटुंब, समाज, देश आणि सारे विश्व सुखी होते.

विपश्यना " बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हाच संदेश सर्व विश्वाला देते. निसर्ग नियमांचे पालन आपल्या जीवनात कसे करायचे याचे प्रशिक्षण देते. धर्माचे पालन करणे म्हणजेच निसर्गाचे नियम आपल्या जीवनात उतरविणे. या निसर्ग नियमाच्या विपरीत वागला की ताणतणावाचे दुःख होते तर अनुरूप वागण्यामुळे शांतीचे सुख मिळते.

विपश्यना जीवन जगण्याची कला तर शिकवतेच तसेच मरणाला सुद्धा कसे सामोरे जावे ही मरण मरण्याची कला सुद्धा शिकविते.


मंगल हो !

*सतीश विष्णू जाधव*

Wednesday, October 14, 2020

भरत भेट सायकल राईड

भरत भेट सायकल राईड

१३ ऑक्टोबर, २०२०

आज कुठे जायचे काहीच नक्की नव्हते. विजयला सुट्टी असल्यामुळे मोठा पल्ला मारायचा हेच डोक्यात होते. सकाळी मुंबई वरून सुरुवात करून पाहिला टप्पा पनवेल अडीच तासात पार केला. तेथून आमच्याकडे तीन पर्याय होते. उरण, कर्नाळा अभयारण्य किंवा कोपर (अलिबाग). 

दोघांनी ठरविले, कोपर गावात नितीन थळे (विजयचा शाळकरी मित्र) याला भेट द्यायची. नितीनला फोन करून जेवायला तुझ्याकडे येतोय, हा निरोप दिला. उन्हाचा कडाका वाढला होता. त्यामुळे भरपूर पाणी पिऊन तसेच हॅन्डग्लोवज आणि स्किनर पाण्याने भिजवून पुढची राईड सुरू झाली. 

पनवेलच्या बाहेर पडून पळस्पे गोवा हायवे पर्यंत प्रचंड ट्राफिक लागली. मोठे मोठे कंटेनर डाव्या बाजूने ओव्हरटेक करत असल्यामुळे डाव्या बाजूच्या पांढऱ्या पट्ट्याच्या आतून राईड करावी लागत होती. दिवसासुद्धा टेल लॅम्प लावून सायकलिंग करत होतो. हायवेला कंटेनरवाले, बसवाले सम्राट असतात तर सायकलिस्ट सेवक. त्यामुळे त्यांच्या पासून चार पावले लांब राहणे शहाणपणाचे असते किंवा आपण थांबून त्यांचा मार्ग प्रशस्त करणे यातच आपली सुरक्षा असते.

पळस्पे फाट्याला पोहोचलो. येथूनच गोवा राष्ट्रीय महामार्ग सुरू होतो. पळस्पेच्या पुढे असलेले शिरढोण हे स्वतंत्रता संग्रामचे आद्य क्रांतिकारक  वासुदेव बळवंत फडके यांचे जन्म गाव. त्यांनीच इंग्रजांच्या विरुद्ध सशत्र क्रांतीचा मार्ग अवलंबिला होता. अठराव्या शतकात त्यांनी मातंग, रामोशी कोळी, धनगर समाजातील तरुणांना एकत्र करून  सशस्त्र  संघटना स्थापन केली आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध आरंभले. काही काळ त्यांनी पुणे शहर अधिपत्याखाली आणले होते. 

शिरढोण येथील त्यांचे जन्मघर आता राष्ट्रीय स्मारक झाले आहे.

 मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळच्या चौकाला वासुदेव बळवंत फडक्यांचे नाव दिलेले आहे.

उन्हात सायकलिंग सुरू होती आणि जिताडा मासा आणि फेमस लपेटा डिशसाठी प्रसिध्द असलेले  साई पॅलेस हॉटेल मागे पडले.  त्या नंतर क्षणभर विश्रांती हॉटेल पासून कर्नाळा अभयारण्याची घाटी सुरू झाली.  हा रस्ता चौपदरी आणि काँक्रीटचा केल्यामुळे घाट सोपा झाला होता, परंतु उन्हाच्या कडाक्यामुळे जबरदस्त दमछाक होत होती. दर दहा किमीवर हायड्रेशन ब्रेक घ्यावा लागत होता. कर्नाळा पार केल्यावर ताराखोप गावाजवळील एका झाडाखाली विजयने बसकण मारली. उन्हामुळे तो कासावीस झाला होता. भरपूर पाणी प्यायल्यावर त्याला तरतरी आली.

पेण पार केले आणि वडखळ बायपास रस्त्यावरून पेडलिंग सुरू झाली. अतिशय खडबडीत रस्ता आणि मोठया गाड्यांमुळे  धुळीचे प्रचंड लोट वातावरणात पसरले होते. डोळ्यावर गॉगल आणि तोंडावर मास्क  लावून सुद्धा घुसमट होत होती. मोठी गाडी बाजूने गेली की धुळीपासून बचावासाठी सायकल थांबवावी लागत होती. पेण ते वडखळ हा सात किमी रस्ता पार करण्यासाठी तब्बल पाऊण तास लागला. 

गोव्याकडे जाणारा रस्ता बायपास करून पोयनाड रस्त्यावर आलो. मध्ये धरमतरची खाडी लागली.

अचानक आभाळ भरून आले. सोसाट्याचा वारा सुटला, विजा कडकडू लागल्या आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. उन्हाने अंगाची झालेली काहिली अचानक आलेल्या सुखद गराव्याने पार नाहीशी झाली. विजयची कळी खुलली. परंतु नुकत्याच ओल्या झालेल्या रस्त्यावर काळजीपूर्वक सायकल हाकत होतो. 

पाऊस सुरू झाला, त्यामुळे गॉगल काढून सायकलिंग सुरू होती. माझ्या सायकलला मडगार्ड नसल्यामुळे हिरवे टीशर्ट पाठीमागून चिखलाच्या ठिबक्यांनी माखून गेले. पोयनाडला नितीनच्या मुलांना मिठाई घेतली. 

पेझारी गाव ओलांडून MIDC रस्त्यावरून मार्गक्रमण सुरू झाले. या रस्त्यावर बिलकुल रहदारी नव्हती. रस्त्याच्या बाजूने जाणारा भलामोठा पाईप सतत आम्हाला साथ करीत होता. अतिशय छोटा परंतु एकदम सुस्थितीत रस्ता असल्यामुळे सायकलिंग करायला मजा येत होती. एक मोठा अवघड चढ लागला. तो पार करताच कोपर गावाची वेस लागली. गावात शिरलो आणि पाच मिनिटातच नितीनच्या घरी पोहोचलो. दारातच आमच्या स्वागताला नितीन उभा होता. विजयला शाळकरी मित्र नितीन भेटताच,  भरत भेटीचा  आनंद झाला होता.   घरात वहिनीने स्वागत केले. मुलाच्या हातात विजयने खाऊ दिला.

हातपाय धुवून फ्रेश झालो आणि चिखलाने माखलेले टीशर्ट कडून दुसरे टीशर्ट घातले. पोटात भुकेचा प्रचंड डोंब उसळला होता. नितीनचा उपवास असल्यामुळे तो अगोदरच जेवला होता. आमच्या जेवणाची सामिष व्यवस्था होती.  घोळीचे कालवण आणि कोळंबीचे सुंगट असा खास बेत होता. पोळी, भात, कालवण आणि कोळंबी मनसोक्त खाल्ली. भोजन झाल्यावर नितीनने वाडीत तयार झालेली छोटी परंतु अतिशय स्वादिष्ट सिताफळे खायला दिली. 

घरात आल्यापासून,  बोलका आणि हसमुख नितीन त्याच्या विविध व्यवसायाबद्दल सांगत होता. घरा बाजूलाच दळण दळण्याची चक्की आहे.

 तांदूळ, गहू, डाळी आणि मिरच्या साठी वेगवेगळ्या घरघंट्या आहेत. सतत काहीतरी काम करण्यात सर्व कुटुंब कार्यरत होते.

नितीन राहण्याचा आग्रह करत होता. परंतु थोड्या गप्पाटप्पा मारून चहा घेऊन  चार वाजता सायकलिंग सुरू केली.  वाघरण, पेंडांबे मार्गे रेवसला जाणारा शॉर्टकट रस्ता आम्ही पकडला. मित्र शरदच्या वाघरण गावाला खूप वेळ भेट दिलेली आहे. त्या आठवणी जागृत झाल्या. ऊन कमी झाले होते. तसेच झाडांमधून जाणारा रस्ता सुखकारक होता. तासाभरात रेवसला पोहोचलो. 

अजूनही रेवस मुंबई लॉन्च सुरू झाली नव्हती, त्यामुळे साडेपाचच्या कारंजा लॉन्च साठी वाट पाहत बंदरावर थांबलो. रेवस कारंजा लॉन्च मध्ये तिकीट तपासणारा 'पूर्वज' भेटला. त्याने सायकलचे भाडे घेतले नाही. करंजा धक्क्यावर उतरताच समोरच दगडांचा बंधारा दिसला. त्या लोकेशन वर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. 

कारंजा वरून मोरा जेट्टी वर जाताना, भाऊ दिलीपचे घर लागते,  त्याला फ्लाईंग भेट द्यायचे ठरले. परंतु नेमका तो घरी नव्हता. तरीसुद्धा पुतण्या आदिनाथची भेट झाली. 

सध्या त्याचे वर्क फ्रॉम होम चालू आहे. सायंकाळी सात वाजताची शेवटची लॉन्च पकडण्यासाठी मोरा बंदराकडे प्रस्थान केले.

पंधरा मिनिटे मोरा जेट्टीवर अगोदर पोहोचल्यामुळे आम्ही दोघे निवांत झालो होतो. जेट्टीवर मस्त वारे वाहत होते. तासभराची लॉन्च राईड करून भाऊच्या धक्क्यावर उतरलो. पी डिमेलो रोडवरून सायकलिंग करीत परेल पर्यन्त आल्यावर जी डी आंबेकर रोडजवळ विजयला रामराम केला. त्या नंतर दहा मिनिटात घर गाठले. 

आज १२० किमी राईड झाली होती. मुंबई, पनवेल, कर्नाळा अभयारण्य, पेण, वडखळ, पोयनाड, कोपर, पेझारी, रेवस, कारंजा, मोरा आणि भाऊचा धक्का असा धक्कादायक सायकल प्रवास केला होता.

 घरातून निघताना कुठे जायचे काहीच ठरविले नव्हते. विजयला शाळेतील मित्राची आठवण झाली आणि आजची अनपेक्षित सायकल सफर झाली. विजयला भरत भेटीचा आनंद झाला होता. तर मला खूप वर्षांनी पुतण्या आदिनाथ भेटला होता. 

 दुर्मिळ झालेल्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या  प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे, सायकलिंगमुळे सहज शक्य होते, याचेच हे उदाहरण आहे. सायकलिंगमुळे किती आनंददायी घटना घडतात याचा खासा अनुभव आम्ही घेतला होता.


सतीश जाधव
आझाद पंछी....

Monday, October 12, 2020

सिद्धिविनायक राईड

सिद्धिविनायक राईड

११ ऑक्टोबर,२०२०

आजची राईड खास चिरागसाठी आयोजित केली होती. सकाळी पावणे सहा वाजता चिराग प्रिन्ससह ठाण्यावरून निघाला. पूर्व द्रुतगती महामार्गावरून दादर मार्गे बरोबर सात वाजता सिद्धिविनायक मंदिराकडे आला. चिरागला आज १०० किमी राईड करायची होती. 

मंदिराजवळ फोटो काढून सुरू झाली सायकल राईड. प्रभादेवी मार्गे आम्ही वरळी चौपाटीवर आलो.  सिलिंक आता हाजी अली पर्यंत नेण्याचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे वरळी चौपाटीला मोठे मोठे पत्रे मारून समुद्र दिसेनासा केला आहे. 
एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात पुस्तक असलेल्या कॉमन मॅन बरोबर  फोटो काढले.

 प्रिन्सचा मित्र सिलिंक कॉर्नरला येणार होता.  तेथे थांबून सिलिंकच्या बॅगराऊंडवर चिरागचे फोटो काढले. 

एक वळसा मारून पोतदार हॉस्पिटलच्या कॉर्नरला चहा पिण्यासाठी हायड्रेशन ब्रेक घेतला. सकाळी सायकलिंग सुरू करताना एखादे फळ, खजूर, लाडू, ड्रायफ्रुट असे काहीतरी खाणे आवश्यक असते. प्रिन्स काहीही न खाता जवळपास तीस किमी राईड करून वरळीला होता. चिराग थोडेसे खाऊन आला होता. दोघांना पौष्टिक लाडू (भूक लाडू) खायला दिले. टपरीवरच्या मामाला मसालेदार चहाची ऑर्डर दिली. अतिशय फक्कड चहा होता. 

आता सुरू झाली गिरगाव चौपाटीकडे सायकल राईड. भूक लाडुमुळे दोघांची एनर्जी बुस्ट झाली होती. टॉप गियरवर जोरदार राईड सुरू झाली. आज खूप हौशे नवसे, गवसे सायकलिस्ट दिसत होते. काही तुरळक सायकलिस्टच्या डोक्यावर हेल्मेट होते. ज्यांच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते अशांना सुप्रभात स्माईल देत, हेल्मेट घालून सायकलिंग करा अशी विनंती करत होतो. 

महालक्ष्मी कडून पेडर रोडचा चढाव आम्ही जोरकसपणे चढून गेलो. पुढचा फ्लाय ओव्हर ब्रिज बंद असल्यामुळे ब्रिज खालून टर्न मारून प्रियदर्शिनी बगीच्याकडे आलो. आता सुरू झाला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचा चढाव.  हा चढाव येऊरची आठवण करून देणारा आहे. बजरंगबलीचे नाव घेऊन या लूपवर तिघांनी जोरदार चढाई केली. टॉपला येईपर्यंत मस्त दमछाक झाली होती. चिराग उस्फुर्तपणे म्हणाला 'एक नंबर चढाई'. 

तीन बत्ती नाक्यावर पोहोचलो. तीन बत्तीला अतिशय शार्प यु टर्न आहे. तो पार केल्यावर राजभवनच्या उतारा वरून अतिशय वेगात सायकली पळू लागल्या. बाबूलनाथ सिग्नल ओलांडून गिरगाव चौपाटीवर आलो. चिराग आणि प्रिन्सला सांगितले, आता स्वतःला अजमावण्याची संधी आहे. आपल्यात किती दम आहे, याची तपासणी आता करा, पळवा सायकली...

भन्नाट वेगात तिघांच्या सायकली पळू लागल्या. इतर सर्व सायकलिस्ट भराभर मागे पडत होते. आज गिरगाव चौपाटी पासून मारिन लाईन्स पर्यंत सायकलींची  खूप गर्दी होती. दहा मिनिटात NCPA ला पोहोचलो. तेथे दोघांना ग्लुकोन डी दिले, एनर्जी आणखी बुस्ट होण्यासाठी.

तेथे वळसा मारून चर्निरोड चौपाटीवर हायड्रेशन ब्रेक घेतला. समुद्रालगतच्या कठड्यावर सायकल घेऊन खूप फोटोग्राफी केली. दोघांना पुन्हा भूकलाडू खायला दिला. 

 आजच्या सायकल सफरीमध्ये शंभर किमी सायकलिंग करायची हे चिराग आणि प्रिन्स ठरवून आले होते. त्यामूळे त्यांना मुंबईच्या वेगवेगळ्या रस्त्याने फिरवावे, हे माझ्या डोक्यात आले. चर्निरोड चौपाटीवरून बाबूलनाथ मंदिराकडून पेडर रोडला वळसा मारल्यावर पारसी डुंगरवाडीचा कोसळलेला भाग दोघांना दाखविला. मोठे मोठे दगड धोंडे अजूनही रस्त्यावर पडलेले होते. तेथून जसलोकचा चढ चढून महालक्ष्मी मंदिराकडे आलो. 

पुढे वरळी नाका गाठल्यावर, दूरदर्शन टॉवर कडून पांडुरंग बुधकर मार्ग गाठला. प्रभादेवी पुलावरून परेल गाठले. दादर हिंदमाता आल्यावर चिराग आणि प्रिन्स यांना टाटा केला आणि पुढच्या ठाण्यापर्यंत सफारीच्या शुभेच्छा देऊन घराकडे परतीची सफर   सुरू झाली.

आजची सायकल सफर सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर,  प्रियदर्शिनी बगीचा, तीन बत्ती नाका,  बाबूलनाथ, गिरगाव चौपाटी, मारिन लाईन्स चौपाटी, हिंदमाता या सर्व स्थळांची ठाणेकरांना पुन्हा एकदा ओळख करून देण्यासाठी होती. खूप समाधान वाटले आजच्या राईडमुळे !!!
चिराग आणि प्रिन्सची शंभर किमी राईडची आकांक्षा आज नक्कीच पूर्ण होणार होती.

सतीश जाधव
आझाद पंछी...

Thursday, October 8, 2020

ईशावास्योपनिषद भाग तीन कर्मयोग

 ईशावास्योपनिषद भाग तीन

कर्मयोग 


कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत् शतं समाः।

एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥


मनुष्याने या जगात कर्म करतांना शंभर वर्षे आनंदाने जगण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे. जो आपली विहित कर्मे योग्य प्रकारे करीत असतो त्याला त्या कर्माचे बंधन कधीही नडत नाहीत.

ईशावास्य उपनिषद हे 'कर्मयोग' सांगते. परंतु जी कर्मे फलदायी वाटत नाहीत ती कर्मे आपण टाळतो आणि ज्या कर्मामुळे आपल्याला धन, कीर्ती, लौकिक मिळत असेल अशी कर्मे करायला आवडतात. पण जेथे आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेथे निराशा येते, जीव क्रोधाने, लोभाने जळू लागतो. 

उपनिषदात फलाची अपेक्षा न करता कर्म करावे असे सांगितले आहे. परंतु या जगात मृत्यूपर्यंत सकाम कर्म करावे लागते असे सांगत त्याचाही निषेध केलेला नाही. निष्काम कर्म अधिक चांगले हे मात्र सांगितले आहे. निष्काम कर्म आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून अर्थात भवचक्रातून सोडविण्यास उपयुक्त ठरते असे हे उपनिषद सांगते.

'सकाम कर्म'  म्हणजे फळ  साध्य करण्यासाठी केलेले कृत्य.

'निष्काम कर्म' म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता  केलेलं कर्म.

 कर्मयोगानुसार निष्काम कर्म केल्यामुळे फळ चांगले मिळो अथवा वाईट, कर्मयोगी...  ना चांगले फळ मिळाले म्हणून आनंदी होत,  ना वाईट फळ मिळाल्यामुळे दुःखी होत. तो सुख आणि दुःखाच्या पलीकडची स्थिती, ज्याला सच्चिदानंद म्हणतात, त्याची अनुभूती घेत असतो. जेव्हा निस्पृहतेने कर्म केले जाते, तेव्हाच हे शक्य होते. 

 कर्म करताना फळाची इच्छा धरली तर त्याला सुख किंवा दुःखाचे फळ प्राप्त होते आणि ती व्यक्ती कर्मफलाच्या बंधनात बांधली जाते.

कर्म कधीही सोडता येत नाहीत, पण बंधनातून अलिप्त असे कर्म करता येते. म्हणून उपनिषद सांगते ‘ विहित कर्म करा’ जसे की नित्याच्या श्वासोच्छवासा प्रमाणे कर्म अगदी सहज, अनायास घडते आहे. 

"विहित कर्म" जसे की लहान बाळ भूक लागली की मोठ्याने रडते. जे मिळेल ते चोखून घेते. जे घेतले आहे,  ते पचविणे आणि झोपणे, ही त्याची विहित कर्मे आहेत. पण तो जसा मोठा होतो तशी त्याची विहित कर्मे बदलत जातात. रांगणे, बसणे, बोलणे ही त्याची विहित कर्मे होतात. नंतर तो विद्यार्थी  होतो. आता तो पाळण्यात झोपणार नाही, पांगुळगाडा चालविणार नाही. अध्ययन त्याचे विहित कर्म होईल. नंतर तो कुटुंबाचे पालन पोषण करणारा जबाबदार गृहस्थ होईल. अशा प्रकारे विहित कर्मे बदलतात. पहिली कर्मे सहज सुटली जातात.  

परंतु जेव्हा बुद्धी चालायला लागते, वासना विकारांचा लेप त्यावर चढतो, तेव्हा मी - माझे, आवड-निवड सुरु होऊन विवेकबुद्धी लोप पावते. येथे विहित कर्म विकारग्रस्त होते आणि मग मनासारखे झाले नाही की अपयश भेडसावू लागते. जगणे निरस होते. मन निराशेने लिप्त होते. 


सत्य हे सुवर्णाच्या झाकणाने झाकलेले असते असे हे उपनिषद सांगते. सत्य समजून घ्यायचे असेल तर सुखदु:खापलीकडे जावे लागते. परंतु मनुष्य सुखाचा अनुभव सोडायला तयार नसतो. या अनुभवाची तो पुन: पुन: प्रतीक्षा करतो. लोभामुळे या सुखाची तो पुन्हा पुन्हा  अपेक्षा करतो . सत्य जाणून न घेता सत्यावरील सुवर्ण झाकणाच्या मोहात पडतो आणि सत्याच्या अतीव आनंदाला मुकतो.

 कर्मफलातून मिळालेल्या सुखालाच तो शाश्वत आनंद मानतो. परंतु ह्या सुखाचा जेव्हा लोप होतो तेव्हा दुःखाची निर्मिती होते. 

सुखाच्या अनुभवालाही दूर लोटून माणूस पुढे जातो तेव्हाच त्याला शाश्वत सत्याचा बोध होतो. यालाच "सच्चिदानंद" म्हणतात.

सर्व ईश्वराचेच आहे, 'माझे' म्हणण्यासारखे जगात काहीच नाही. म्हणून “ मी – माझे ” याला  काहीच अर्थ नाही. 'मी' हा 'माझे' या भावनेवर पोसलेला असल्याने 'मी'पणाही निरर्थक आहे,  हेच हे उपनिषद आग्रहाने सांगते. जसे की ... आजची भाकरी मी खाल्ली उद्याची मिळणार आहे. म्हणून भरून ठेवलेले धान्य रोज कोणी मोजत नाहीत. हे माझे आहे असा जपही करत नाहीत. त्याचा विनियोग आवश्यक तेव्हा करतो. वेळेला सर्वांच्या उपयोगासाठी करतो. त्याचा ध्यास सोडून देतो. 

 काम करणे अगत्याचे आहे की नाही ते पाहणे महत्वाचे आहे. ते काम जरुरीचे असेल तर  करताना सर्व  चित्तवृत्ती गुंतल्या पाहिजेत, तरच ते काम सुरेख होते.  परंतु बऱ्याच वेळेला आपल्या वाट्याला आलेले काम हीन दर्जाचे वाटते. दुसऱ्याला मिळालेले सगळे चांगले वाटते. त्याचे घर, त्याचे ऐश्वर्य, त्याची मुले चांगली वाटतात. तुलना करून  मन दुषित करणे, पुन्हा त्यात ‘मी’पणा कालवून कामाचे रूप बिघडवून टाकणे, या मुळेच नातेसंबध दुरावतात. 

आपल्याकडे येणारी कामे प्रसन्न मनाने कुशलतेने करणे हा ‘योग’ आहे, यज्ञ आहे. कृतज्ञता मनात ठेऊन कर्म करणे म्हणजे यज्ञ होय. जेवणाच्या अगोदर आपण प्रार्थना करतो “ उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ” आपल्या जठराग्नित दिलेली ती आहुती आहे.  मग जिभेचे चोचले राहत नाहीत. अन्नाला नावे ठेवणे, नासधूस करणे हे घडत नाही. स्वयंपाक करणे ही यज्ञकर्माची पूर्वतयारी आहे. ते आनंदाने, प्रेमाने केले की आपोआप रुचकर, पुष्टीकर होईल. 

उपनिषदात सांगितल्यानुसार जीवन जगताना .. करावी लागणारी / निवड केलेली कामे  आनंदाने, कुशलतेने, कुणाशीही तुलना न करता , 'मी' पणा दूर सारून केल्यास आनंदात शंभर वर्षे जगणे सहज सुकर होईल.


// श्री कृष्णार्पणमस्तु //

Tuesday, October 6, 2020

धुवाधार राईड...

धुवाधार राईड.....

घोडबंदर लूप...

६ ऑक्टोबर २०२०

खूप दिवसापासून घोडबंदर लूप मारायचे डोक्यात होते. विजयने नुकतीच हरिहरेश्वर राईड दिमाखात पूर्ण केली होती. त्यामुळे तो नवनवीन आणि दमदार  राईड करण्यासाठी आतूर होता. 

सकाळी पावणे पाचला घरातून निघालो. विजय बरोबर पाच वाजता दादर सेनाभवन जवळ तयारीतच होता. आझाद पंछी गृपवर लाईव्ह लोकेशन टाकून सुरू झाली, धुवाधार राईड. पाऊस संपल्यातच जमा होता. त्यामुळे साधारण तीस किमी वेगाने सायकली पळत होत्या. 

कमी रहदारी, निवांत रस्ता आणि सुखद वातावरणात हेडलॅम्पच्या प्रकाशात जोरदार पेडल मारत होतो. काल घरी बनविलेला मेथीचा लाडू सकाळीच खाल्ल्यामुळे घोड्याची ऊर्जा आली होती.  विजय सुद्धा आयुर्वेदिक मसालेदूध पिऊन आला होता. त्यामुळे तो सुद्धा कसदार मल्लासारखा माझ्या मागे भिडला होता. 

माहीम कॉजवे वरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर आलो आणि सायकलचा वेग आणखी वाढला. आम्ही आता वाऱ्याशी स्पर्धा करत होतो. पार्ले - अंधेरी केव्हा मागे पडले, कळलेच नाही. बरोबर सहा वाजता दिंडोशी फ्लॅओव्हर ओलांडून, मालाड फ्लाय ओव्हर जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला. पाच  मिनिटात  अतुल ओझा आम्हाला जॉईन झाला.

आता सुरू झाली, तिहेरी राईड. अतुलने रोडिओ सायकल आणली होती. पेडलिंग करताना त्याच्या सायकल मधून सतत टक... टक... आवाज येत होता. पण पळायला एकदम भारी होती. दहिसर टोल नाक्याजवळ तुफान ट्रॅफिक होती. सर्व रहदारी चुकवत  कॉर्नर लेन मधून सायकल बाहेर काढल्या. आता अतुल लीड करत होता. घोडबंदर नाक्यावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे डाव्या लेन मधून उजव्या लेन मध्ये सायकली आणताना हात दाखवत खूपच सावधगिरी बाळगावी लागली. 
घोडबंदर फाउंटन हॉटेलकडे उजव्या बाजूला वळसा मारून घोडबंदर घाट चढू लागलो. 

अहाहा... डोंगराआडून सूर्याचे दर्शन झाले. आसमंत तांबूस सोनेरी रंगाने उजळून निघाले होते. 

या लोकेशन वर ४० नंबरचा बोर्ड लागला. काय बरे सांगत असावा हा बोर्ड... साठी पार केली पण चाळीशीची रग आहे, असेच काही तरी सांगत असावा काय?  सूर्याच्या दर्शनाने आणखी ऊर्जा मिळाली आणि त्याच तडफेत घाट चढून गेलो. 

आता उतारावर सायकलचा वेग चौपट झाला. तडक गायमुख चौपाटी गाठली. हायड्रेशन ब्रेकसाठी आम्ही थांबलो. 

येथे ठाण्याचा सायकलिस्ट भाग्येश बोनवटेची भेट झाली.  याच्या सोबत आणखी दोन सायकलिस्ट मित्र होते. हसतमुख भाग्येशने चहा ऑफर केली. एकदम भावला भाग्येश. त्या तिघांना मेथीचा (भूकलाडू) लाडू दिला. आमचा निरोप घेताना माझ्याबरोबर राईड करायचे आश्वासन भाग्येशने दिले. 

आम्ही तिघांनी मेथी लाडू, तसेच विजयने आणलेले आयुर्वेदिक मसाले दूध आणि हाइड & सिक बिस्किटे फस्त केली. फोटो काढून नव्या जोमाने ठाण्याकडे राईड सुरू झाली. 

ठाण्यात शिरताच रहदारीने गाठले. परंतु विजयच्या डोक्यात वेगाची नशा होती. त्यामुळे वेग तिळमात्र सुद्धा कमी झाला नाही. पवई बायपासला अतुलला टा टा केला. विक्रोळीला आल्यावर पाच मिनिटांचा पॉवर ब्रेक घेतला. पाणी पिऊन जोमदार राईड सुरू झाली. ट्राफिकमध्ये मोटार सायकलच्या पुढे सायकल पळत होत्या. दादरला विजयला बाय बाय केले.  घरातून निघताना जो वेग होता त्याच वेगात साडेनऊ वाजता घरी पोहोचलो. 

अशा प्रकारे धुवाधार राईडची सांगता झाली. हायड्रेशन ब्रेक सोडून चार तासात ९५ किमी राईड झाली होती. उरलेले ५ किमी,  सायकलिंग करत बँकेत जाऊन भरून काढले. जवळपास ताशी २४ किमी वेगाने आज सायकल पळाली होती.

MTB कमी वेगात पळते. ह्या विधानाचा भ्रमनिरास झाला होता. समर्पयामीचा  मयुरेश एकदा म्हणाला होता, "वेग सायकल मध्ये नसतो, तर तो डोक्यात असतो".

खूप राईड केल्यावर जाणले आहे, भारतातील रस्त्यांसाठी MTB सायकलच सुयोग्य आहे.


सतीश जाधव
आझाद पंछी.....

Sunday, October 4, 2020

श्री हरिहरेश्वर सायकलिंग दिवस २

श्री हरिहरेश्वर सायकलिंग दिवस २

२७ सप्टेंबर,२०२०

पहाटे साडेचार वाजता कुणाल चहा आणि बिस्किटे घेऊन आला. आज लांबचा पल्ला असल्यामुळे विजय आणि मी पहाटे चार वाजता उठलो होतो.   प्रवासात खाण्यासाठी संध्याने राजेळी केळ्यांचा घड दिला होता.   सर्व तयारी करून सव्वा पाच वाजता कुणालला राम राम करून श्री हरिहरेश्वरकडे सायकल सफर सुरू केली. 

अलिबाग पर्यंत रस्त्यावर लाईट असल्यामुळे दहा मिनिटात अलिबाग बायपास वरून आक्षी गावाकडे वळलो. आता अंधारात सायकल हेड लाईट लावून सायकलिंग करत होतो. रस्ते खडबडीत असल्यामुळे खूपच हळू आणि सावधगिरीने पेडलिंग करत होतो.

 आमच्या स्वागताला गावागावात कुत्र्यांच्या फौजा उभ्या होत्या.  कुत्र्यांना चुकविण्याचे टेक्निक विजयला सांगितले. कुत्रे सायकल मागे भुंकत पळू लागले की वेग न वाढविता, चक्क सायकल थांबविणे. त्यामुळे धावणारे कुत्रे मागच्या मागे पळत सुटतात. पहाटे सायकलिंग करताना हे तंत्र खूप उपयोगाला येते.

तासाभरात रेवदंडा पुलावर पोहोचलो. आता छान उजाडलं होत. मासेमारी बोटी रेवदंडा खाडीतून जेट्टीकडे येत होत्या. बोटींच्या शिडावर लावलेले विविध झेंडे सकाळच्या वाऱ्यावर फडकत होते. 

ढगा आडून उगवणाऱ्या सूर्यनारायणाच्या सोनेरी प्रभा खाडीच्या जलातून तरंगत आमच्याकडे येत होत्या. पाण्यावर उठणाऱ्या तरंगांना सुवर्ण छटा लाभल्या होत्या. काळे मेघ सूर्याला व्यापण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु पूर्वेला उगवणारा दिवाकर त्याला भेदून धरेकडे धाव घेत होता किरणांच्या रूपाने. पश्चिमेला असणारे पांढरे ढग सोन्याची आभूषणे लेऊन भास्कराचे स्वागत करीत होते.

रेवदंडा पूल ओलांडल्यावर कोरलाई गाव लागले. गावाच्या प्रवेशद्वारालाच मोठे चर्च आहे. रविवारची मास प्रे चालू होती. विशेष म्हणजे संपूर्ण प्रार्थना मराठीतून सुरू होती आणि रस्त्यावर जागोजागी लाऊड स्पीकर लावून प्रार्थना ऐकविली जात होती. हे कोरालाई गाव पूर्वी पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. येथील गावकऱ्यांची  भाषा सुद्धा पोर्तुगीज मिश्रित आहे. 

कोरलाई ओलांडले आणि काशीद बीचकडे सफर सुरू झाली. कोलमंडळे गाव सोडले आणि काशीद घाटी सुरू झाली. पावसामुळे घाटातील  रस्ता एकदम ओबडधोबड झाला होता. मध्येच बऱ्यापैकी डांबरी रस्ता लागल्यावर वेग वाढविला की अचानक ऑफ रोडिंग सुरू व्हायचे, उतारावर ताबडतोब वेग कमी करून सीटवरून थोडे वर उठून शरीराला आणि विशेष करून माणक्यांना बसणारे हादरे टाळावे लागत होते. 

काशीद बीच सुरू झाला.  जवळपास तीन किमी रस्ता समुद्र किनाऱ्याने एक सलग सापटीवरून आमची सायकलिंग सुरू होती.  डाव्या बाजूला फणसाड अभयारण्याचा हिरवागार परिसर आणि उजव्या बाजूला निळेशार समुद्राचे पाणी, या मधून वळणावळणाच्या वाटेने जाताना अतिशय धीम्या गतीने सायकल चालवीत होतो. दूरवर दिसणाऱ्या मासेमारीच्या बोटी किनाऱ्याकडे येत होत्या, रविवारचा बाजार घेऊन. सकाळपासून दोन तास सायकलिंग झाली होती. काशीद चौपाटीवर हायड्रेशन ब्रेक घेतला. 

थोड्या वेळातच नांदगाव बाजारपेठ लागली. तुरळक दुकाने उघडली होती. गाव लागले की स्पीडब्रेकरचे राज्य सुरू होते. वेगात असलेली सायकल स्पीड ब्रेकर जवळ आली की ब्रेक कंट्रोल करून दोन्ही हाताने हँडल भक्कमपणे पकडून पलीकडे जावे लागते. आम्हा दोघांच्या हायटेक सायकल आणि सस्पेंशन असल्यामुळे,  शरीराला कोणताही  त्रास  होत नव्हता. खरचं समर्पयामिने दिलेली कॅननडेल सायकल माझी खास काळजी घेत होती.

नांदगाव सोडले आणि पुन्हा घाटीचा रस्ता सुरू झाला. रस्ता लहान होता परंतु रहदारी तुरळक असल्यामुळे सायकलिंग करणे सुलभ झाले होते. आताचा घाट बऱ्यापैकी दमछाक करणारा होता. उन्हे वाढायच्या आत मुरुड गाठायचे असल्यामुळे दोघांनी जोर मारला. घाटाच्या टॉपला येताच मुरुडच्या सिद्दी सरदाराचा राजवाडा लागला. येथूनच मुरुडचा विहंगम समुद्रकिनारा दृष्टीक्षेपात आला. समुद्रातील पद्मदुर्ग दिसू लागला. उतारावर सायकलचा वेग वाढला. मुरुडच्या वेशिवरच कोटेश्वराचे भव्य मंदिर आहे.
उंच सखल, वेडावाकडा, ओबडखाबड रस्त्यावरून साडेतीन तास राईड झाली होती. आता भरपेट नास्ता करणे आवश्यक होते. मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावरील टपरीवजा काळभैरव टी स्टॉल जवळ विसावलो आणि चटपटीत बुर्जी पावची ऑर्डर दिली.  

कुणालला तसेच घरी फोन करून मुरुडला सुखरूप पोहोचल्याची वर्दी दिली. बुर्जी पाव, कांदापोहे आणि मसाला चहा घेऊन मुरुड जंजिऱ्याच्या दिशेने राईड सुरू केली. 'एकदारा' पूल ओलांडला आणि जंजिरा घाटी सुरू झाली. या रस्त्यावर वडाची खूप झाडे आहेत. या झाडांच्या पारंब्या  रस्त्यावर पसरल्या होत्या. जटा वाढलेल्या एखाद्या ध्यानस्थ साधू सारखी ही झाडे भासत होती.
चढ चढून आलो आणि लांबवर समुद्रात मुरुड-जंजिरा किल्ला नजरेस पडला. किनाऱ्यावर वसलेले राजपुरी गाव सुद्धा दिसू लागले. राजपुरी गावात पोहोचलो. जंजिऱ्यावर जाणारी बोट सर्व्हिस बंद होती. तेथून पेडलिंग करत आगरदांडा जेट्टीवर पोहोचलो. येथून पुढची सफर बार्झ मधून होती. या मोठ्या बोटीतून कारसुद्धा पलीकडच्या दिघी बंदरात  पोहोचवली जाते. या दहा मिनिटाच्या बोट सफरीची खासियत म्हणजे सुसाट वाहणारे वारे. 

दिघी जेट्टीवरून पुढची सफर सुरू झाली. सुरुवारीलाच चार पदरी सिमेंट काँक्रीट रस्ता लागला, तेव्हा मन एकदम आनंदित झाले.  सागरी महामार्गाची ही झलक होती. जेमतेम अर्धा किमी गेलो आणि खड्ड्यात रस्ता हरवून गेला. चढ सुरू झाला, त्यात ऑफ रोडिंग रस्ता. अशा वेळी कस लागतो.  जेव्हा चढाचा रस्ता खडबडीत असतो तेव्हा पेडल करताना जास्त जोर काढावा लागतो. घाटाच्या टॉपला पोहोचलो.  दमछाक झाली होती.

 थोडावेळ विश्रांती घेऊन उतारावर सुद्धा सावधगिरी बाळगत वेगात सायकलिंग सुरू झाली. वेळास गावच्या मारुती मंदिराला वळसा घालून वडगाव  फाट्यावर आलो. येथून एक रस्ता म्हसळा गावाकडे जातो. दिवेआगार येथून तीन किमी अंतरावर होते. 

दिवेआगारकडे राईड सुरू झाली. दोन्ही बाजूला नारळ पोफळीच्या झाडांची दाटी आणि गच्च हिरव्यागार वनराईने नटलेला वळणावळणाचा रस्ता इंद्राच्या दरबारातील नृत्य करणाऱ्या कामनीय अप्सरेसारखा भासत होता. 

दुपारचा एक वाजला होता. जेवणासाठी हॉटेलची, खानावळीची चौकशी सुरू केली. गावच्या बाजारपेठ परिसरात अजूनही खानावळी सुरू झाल्या नव्हत्या. खूप फिरल्यावर प्रसन्न महेश हॉटेल सापडले. जेवणाची पार्सल सर्व्हिस मिळेल असे मालकाने सांगितले. विजयने सांगितले आम्ही समोरच्या झाडाखाली बसतो, प्लेट मध्ये जेवण द्या. आम्ही मुंबईवरून सायकलिंग करतोय, तसेच आमचा अवतार पाहून मालकाला दया आली. आमची हॉटेलमध्येच जेवणाची व्यवस्था झाली. सुरमई फिश फ्राय जेवण घेऊन सागर किनाऱ्याने श्रीवर्धनकडे प्रस्थान केले. 

दिवेआगार ते श्रीवर्धन हा सोळा किमी रस्ता खाचखळग्याचा असला तरी सागराचे मनोहारी दर्शन सतत होत होते. डोंगराळ  रस्ता, दमट वारे आणि सागर लहरींचे किनाऱ्याशी होणारे मिलन, फेसाळत उठणाऱ्या लाटा, दूरवर दिसणारे क्षितिज यामुळेच समुद्र महामार्गावरून सुरू असलेली सायकल सफर सुसह्य आणि मनोहारी झाली होती. 

जेवणानंतर दुपारच्या वेळी पेडलिंग करणे जिकरीचे होते.  त्यामुळे मंदगतीने सायकलिंग सुरू केले. एका चढावर विजयला पेंग येऊ लागली. तेव्हा  डेरेदार वृक्ष पाहून अर्ध्या तासाची छोटी वामकुक्षी घेतली. श्रीवर्धनला पोहोचायला सायंकाळचे चार वाजले होते.  आता चहा ब्रेक घ्यायचे ठरले. 

श्रीवर्धनमध्ये शिरताना "आपले सहर्ष स्वागत आहे" हे  भल्या मोठ्या कमानीवर लिहिलेले वाक्य वाचून खूप आनंद झाला. समुद्र किनारी वसलेले श्रीवर्धन गाव अतिशय गजबजलेले होते. बाजारपेठेतून जाणारा मुख्य रस्ता एकदम चिंचोळा होता.  चहाच्या शोधात समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या दर्गे यांच्या छोट्याश्या हॉटेलमध्ये थांबलो. 


हॉटेलातील मिठाईच्या वासाने तोंडाला पाणी सुटले.  नुकतीच बनविलेली  मावा मिठाई समोरच्या कपाटात ठेवली होती. विशेष म्हणजे या हॉटेल मध्ये येणारा प्रत्येक गिऱ्हाईक मिठाई खात होता. आम्ही सुद्धा मिठाई मागविली. अतिशय मुलायम आणि खुसखुशीत होती मिठाई.  मन तृप्त झाले. 

येथून हरिहरेश्वरकडे शेवटचा १९ किमीचा लॅप सुरू झाला.  या मार्गावर मध्येमध्ये गावे असल्यामुळे स्पीडब्रेकर लागत होते. आता जोर मारणे आवश्यक होते. हरिहरेश्वर घाट सुरू झाला. दमछाक झाली तरी अंधार पडण्यापूर्वी हरिहरेश्वर गाठायचे हा ध्यास घेतला होता. सायंकाळी तेजोगोल अस्ताला जाण्याच्या तयारीत होता. नाभतील मेघांच्या कडा सुवर्ण मुलामा लेऊन सजल्या होत्या. आमचा मार्ग प्रशस्त करून श्री हरिहरेश्वराच्या भेटीसाठी बळ देत होत्या. 
घामाने ओथंबून आम्ही परमेश्वराच्या पायरीपाशी पोहोचलो. दोन्ही बाजूला बंद असलेल्या दुकानांच्या  चिंचोळ्या मार्गातून सायकलसह मंदिराजवळ पोहोचलो.

 बरोबर साडेसहा वाजता गुरुजीनी देवाचा दिवा लावण्यासाठी  मंदिर उघडले. देवदर्शनासाठी मुंबई वरून सायकलिंग करत आलो आहोत हे कळल्यावर,  अहो आश्चर्यम... गुरुजींनी आम्हाला देवाचे,  श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात बोलावले. देवाच्या दरबारात फक्त आम्ही दोघेच होतो... निव्वळ भारावलेल्या अवस्थेत.
 
सूर्यास्त झाला आणि देवाचा दिवा लागला. आमच्या कठोर परिश्रमला फळ आले होते.  गेली सात महिने मंदिर बंद आहे, परंतु आजच्या १२० किमी च्या कठोर परिश्रमाने केलेल्या तेरा तासाच्या राईडमुळे श्री हरिहरेश्वराने आम्हाला दर्शन दिले होते. इतकेच नव्हे तर मंदिराजवळ असलेल्या खडपा लॉज मध्ये राहायची व्यवस्था सुद्धा झाली. फ्रेश होऊन, आठ वाजता जेवून निद्रादेवीच्या कधी आधीन झालो, हे कळलेच नाही. 

आजची राईड सर्वार्थाने अतिशय विशेष होती. सकाळी साडेपाच वाजता सुरू केलेली राईड सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण झाली होती. जवळपास संपूर्ण ऑफ रोडिंग रस्त्याने केलेली राईड, शरीराचा आणि मनाचा कस लावणारा होती. परंतु अनपेक्षित देव दर्शनाने श्रमसाफल्याचा अपरिमित मानसिक आनंद मिळाला होता. श्री हरिहरेश्वराने आमची सायकल सफर पावन केली.

आजच्या सफरी निमित्ताने निसर्गाचे स्तवन स्फुरले...

आम्ही आनंदे  रोज गातो नाचतो 
पहिला की शेवटचा कोण मोजतो

दिनक्रम आमचा रोज मजेचा
प्रभात संध्या आनंदाचा

निसर्ग आमचा साथीदार
मौज मजा असे बहारदार

लाल केशरी संध्याकाळी
लेऊन सारी नवी नव्हाळी

कळ्यांची फुले फुलताना
वाऱ्यासंगे सुगंध वाहताना

शीळ वाजवीत वाहे पवन शीत 
पानापानांत गातसे मधुरसे गीत

तेज मंद  केशरी लालिमा नवा 
उगवता चंद्रमा  उडे पक्षी थवा

हृदयस्थ आहे निसर्ग-ईश्वर
अवचित भेटे हरिहरेश्वर
 

सतीश जाधव
आझाद पंछी ...